लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : मांढळ (ता. कुही) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पचखेडी उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आराेग्यसेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने झाेपेच्या गाेळ्या खाल्ल्या असाव्या, अशी शक्यता डाॅक्टरांनी व्यक्त केली.
दुर्गा कवराती (३९) त्या आराेग्यसेविकेचे नाव आहे. त्यांची नियुक्ती पचखेडी (ता. कुही) उपकेंद्रात करण्यात आली आहे. त्या साेमवारी (दि. २१) रात्री मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रातून कर्तव्य आटाेपून पचखेडीला परत गेल्या हाेत्या. रात्री १० वाजताच्या सुमारास त्या वेलतूर येथील आराेग्यसेविकेशी फाेनवर बाेलल्या. मंगळवारी सकाळी त्यांच्या पतीने संपर्क केला. परंतु, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पतीने उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कर्मचाऱ्याने त्यांच्या क्वाॅर्टरचे दार ठाेठावले. प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्याने दार ताेडले तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली असून, त्यांनी झाेपेच्या गाेळ्या खाल्ल्या असाव्या, अशी शक्यताही व्यक्त केली.
त्यांच्याकडे डाेंगरमाैदा उपकेंद्राचा प्रभार आहे. मांढळ, पचखेडी व डाेंगरमाैदा येथे कर्तव्य बजावताना त्यांची फरफट हाेत असून, सततच्या कामामुळे ताणही वाढला आहे. त्यांच्याकडे चिठ्ठी आढळून आली असून, वरिष्ठांचा त्रास असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. रचना नागदेवे यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी ‘मी उद्याला सांगेन’,असे म्हणत प्रतिक्रिया देण्यास टाळले.