राकेश घानोडे
नागपूर : भारतीय पुरावा कायद्यामध्ये गुन्हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे लागतील, याची संख्या निश्चित करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीला त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यासाठी ढीगभर पुराव्यांची गरज नाही. विश्वासार्ह असलेल्या एकमेव पुराव्याच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका खून प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. (Heaps of evidence are not required to convict an accused; High Court)
न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. अशोक किसन कन्नाके (४२) असे आराेपीचे नाव असून तो गोधनी, ता. उमरेड येथील रहिवासी आहे. सासऱ्याचा खून आणि सासू व पत्नीला गंभीर जखमी करण्याच्या गुन्ह्यामध्ये या आरोपीला सत्र न्यायालयाने १२ ऑगस्ट २०१६ रोजी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली, तसेच २० वर्षे कारावास भोगल्याशिवाय त्याला शिक्षेत सूट देण्यास मनाई केली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सासूचे बयाण विश्वासार्ह नाही. तिच्या बयाणामध्ये विरोधाभास आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने केवळ सासूच्या बयाणावरून शिक्षा सुनावून चूक केली, असा दावा आरोपीने अपिलावरील अंतिम सुनावणीदरम्यान केला. उच्च न्यायालयाने आरोपीचा हा दावा वरील निरीक्षण नोंदवून अमान्य केला आणि सासूच्या बयाणाचा एकमेव पुरावाही आरोपीला या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यासाठी पुरेसा आहे, असे स्पष्ट केले.
अशी घडली घटना
आरोपीच्या सासऱ्याचे नाव मधुकर गेडाम होते. सासूचे नाव चंद्रभागा, तर पत्नीचे नाव पुष्पा आहे. आरोपीला दारूचे व्यसन होते. तो पुष्पाचा छळ करीत होता. त्यामुळे पुष्पा २५ जानेवारी २०१५ राेजी उदासा येथील माहेरी आली होती. आराेपीने दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन पुष्पाला घरी परत येण्यासाठी धमकावले. दरम्यान, चंद्रभागाने जशास तसे उत्तर दिल्यानंतर आरोपी निघून गेला. ३० जानेवारी रोजी रात्री आरोपीने तिघांवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात मधुकरचा मृत्यू झाला.