नागपूर : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या अर्जावर आता २१ एप्रिलला सुनावणी होणार आहे. समिती अध्यक्ष न्यायमूर्ती डी. झोटिंग नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जमीन नातेवाईकांना कमी दारात मिळवून दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर आहे. याच आरोपामुळे त्यांना महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. समितीने महसूल व एमआयडीसी विभागातील अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. त्याचप्रमाणे एकनाथ खडसेंचीही साक्ष नोंदविली. सुरुवातीला या व्यवहाराशी संबंध नसल्याचे खडसेंनी म्हटले होते. समितीसमक्ष मात्र आपल्याला खरेदी प्रकरणाबाबत माहिती नसल्याची साक्ष दिली. दरम्यान खडसेंनी समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेण्यासोबत पुण्याचे जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी नव्याने साक्ष नोंदविण्यासाठी अर्ज केला. समितीने नव्याने चौकशी करण्याचा अर्ज फेटाळून लावला. कार्यकक्षेवरील अर्जावर निर्णय घेण्यासाठी आज सुनावणी होणार होती. मात्र आज समिती अध्यक्ष झोटिंग अनुपस्थित होते. त्यामुळे यावर सुनावणी झाली नाही. आता यावर २१ ला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)समितीचा कार्यकाळ संपाला चौकशीसाठी २३ जून २०१६ ला समिती गठित करण्यात आली होती. समितीला सहा महिन्यात अहवाल द्यायचा होता. शासनाने समितीला आतापर्यंत तीनदा मुदतवाढ दिली आहे. ३१ मार्चला समितीची मुदत संपली असून समितीने मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. मात्र अद्याप त्यास मुदतवाढ मिळाली नसल्याची माहिती आहे.
खडसेंच्या अर्जावर २१ ला सुनावणी
By admin | Published: April 16, 2017 1:36 AM