डब्बा व्यापारप्रकरण : सरकारचे उत्तर दाखलनागपूर : नऊ हजार कोटी रुपयांच्या डब्बा व्यापारप्रकरणी तीन आरोपी व्यापाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले असून, त्यांच्या अर्जांवर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला यांच्या न्यायालयात ३१ मे रोजी सुनावणी होणार आहे. दिनेश भंवरलाल सारडा रा. रामदासपेठ, अंकित ओमप्रकाश मालू रा. वाठोडा आणि विनय ओमप्रकाश अग्रवाल रा. सूर्यनगर, अशी आरोपी व्यापाऱ्यांची नावे आहेत. या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जातच तात्पुरत्या अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने नकार देऊन सरकार पक्षाला उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस जारी केली होती. त्यावर गुरुवारी सरकार पक्षाकडून न्यायालयात उत्तर दाखल करून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले जावे, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने तिघांच्याही अर्जावर ३१ मे रोजी सुनावणी निश्चित केली आहे. १३ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी विविध व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांवर धाडी घालून कोट्यवधींचा डब्बा व्यापार उजेडात आणला होता. २० जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४६८, ४७१, ४७७ (अ), ४२०, १२० (ब), २०१ आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन अॅक्टच्या कलम २३(१)अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी कुशल किशोर लद्दड, विजय चंदूलाल गोखलानी, नीरज ओमप्रकाश अग्रवाल, प्रीतेश सुरेशकुमार लखोटिया यांच्यासह १३ जणांना अटक करण्यात आलेली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे. ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतलेल्या या तीन आरोपींव्यतिरिक्त बरेच आरोपी फरार आहेत. न्यायालयात सरकारच्या वतीने मुख्य जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे आणि अतिरिक्त सरकारी वकील अजय माहूरकर काम पाहत आहेत.(प्रतिनिधी)
तिघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ३१ रोजी सुनावणी
By admin | Published: May 27, 2016 2:49 AM