लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या मालकीच्या भाडेपट्ट्यावर दिलेल्या मालमत्ता संदर्भातील तक्रारींवर१७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात सुनावणी होणार आहे.
भाडेपट्टा नूतनीकरण, भाडेपट्टा हस्तांतरण, ना-हरकत, बांधकाम ना-हरकत, भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग झाल्यास करावयाच्या कार्यवाहीसंबंधी जे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे, त्या धोरणा अन्वये करण्यात येत असलेल्या कार्यवाहीसंबंधी भाडेपट्टाधारकांच्या ज्या तक्रारी आहेत, या अनुषंगाने भाडेपट्टाधारकांची सुनावणी घेण्यासाठी माजी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत समिती गठित करण्यात आली आहे. समितीत विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, वैशाली नारनवरे, नासुप्र विश्वस्त संजय बंगाले व महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे आदींचा समावेश आहे. संबंधित भाडेपट्टाधारकांनी १६ जुलैला सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत तक्रार अर्ज मनपाच्या स्थावर विभागाकडे करावे, असे आवाहन उपायुक्त (मालमत्ता) विजय देशमुख यांनी केले आहे.