कथित नक्षलवादी साईबाबाच्या अपीलवर हायकोर्टच्या नवीन न्यायपीठात सुनावणी
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 23, 2023 02:30 PM2023-06-23T14:30:26+5:302023-06-23T14:31:46+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आदेश : दहशतवादी कारवायांचे प्रकरण
नागपूर : कथित नक्षलवादी प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या चार साथिदारांद्वारे दहशतवादी कारवाया प्रकरणातील शिक्षेविरुद्ध दाखल अपीलवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्या नवीन न्यायपीठासमक्ष अंतिम सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या एप्रिलमध्ये यासंदर्भात आदेश दिला होता. अंतिम सुनावणीचा कार्यक्रम येत्या १७ जुलै रोजी निर्धारित केला जाणार आहे.
साईबाबाच्या साथिदारांमध्ये महेश करिमन तिरकी, हेम केशवदत्ता मिश्रा, प्रशांत राही नारायण सांगलीकर व विजय नान तिरकी यांचा समावेश आहे. पाचवा साथिदार पांडू पोरा नरोटे (रा. मुरेवाडा, ता. एटापल्ली) याचा २५ ऑगस्ट २०२२ रोजी आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. बेकायदा कारवाया (प्रतिबंधक) कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्याची मंजूरी मिळविण्याच्या बंधनकारक तरतुदीचे कायदेशीरपणे पालन करण्यात आले नाही, या तांत्रिक कारणामुळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तिद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांनी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी साईबाबा व त्याच्या चार साथिदारांना निर्दोष सोडले होते. त्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने १९ एप्रिल २०२३ रोजी प्रकरणातील पक्षकारांची सहमती लक्षात घेता तो वादग्रस्त निर्णय रद्द केला आणि हे प्रकरण कायद्यानुसार नव्याने निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविले. तसेच, पक्षकारांच्या हिताकरिता या प्रकरणावर नवीन न्यायपीठामध्ये कार्यवाही पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. गडचिरोली सत्र न्यायालयाने ७ मार्च २०१७ रोजी विजय तिरकीला १० वर्षे सश्रम कारावास तर, इतर सर्व आरोपींना जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली आहे. तसेच, सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड ठोठावला आहे. त्यावर आरोपींचा आक्षेप आहे.
गडचिरोलीतून झाली कारवाईला सुरुवात
या आरोपीविरुद्धच्या कारवाईला गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात झाली. गडचिरोली विशेष शाखेत कार्यरत तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड यांना महेश तिरकी व पांडू नरोटे हे सीपीआय (माओवादी) व आरडीएफ या प्रतिबंधित संघटनांचे सक्रीय सदस्य असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलीस या दोघांवर पाळत ठेवून होते. हे दोघे २२ ऑगस्ट २०१३ रोजी अहेरी बस स्थानक येथे भेटले. पोलिसांनी संशयास्पद हालचाली पाहून या दोघांसह हेम मिश्रालाही ताब्यात घेतले. पुढील चौकशीमध्ये साईबाबाने नक्षलवादी नर्मदाक्का हिच्यासाठी मिश्रामार्फत देशविरोधी कटाची माहिती पाठविली होती, ही बाब पुढे आली. या कटात राही व विजय तिरकीदेखील सामील असल्याचे समजले. परिणामी, या सहाही आरोपींना गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.