मध्यवर्ती तुरुंगातील घटना : रुग्णालयात भरती नागपूर : तुरुंगात झालेल्या मारहाणीमुळे एका कैद्याला ‘हार्ट अटॅक’ आला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. नारायण केवटे असे कैद्याचे नाव असून तो मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४५ वर्षीय केवटे याचा काही कैद्यांसोबत खर्रा आणि भोजनावरून वाद झाला. त्यावरून कैद्यांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्याला छातीत दुखू लागले. त्याला तातडीने मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी अॅन्जिओग्राफी करण्यात आली. सूत्रानुसार तुरुंगात अनेक सराईत गुन्हेगार कैदी आहेत. त्यांच्यात नेहमीच मारहाण होत असते. ‘जेल ब्रेक’च्या घटनेनंतर प्रशासन अधिक दक्ष झाले आहे. त्यामुळे तुरुंगात झालेल्या घटनांनी बाहेर माहिती मिळत नाही. केवटे याच्यासोबत यापूर्वी सुद्धा कैद्यांसोबत वाद झाला होता. २००३ मध्ये तुरुंगातील डॉक्टरसोबतही त्याचा वाद झाला होता. नेहमी वाद घालत असल्याने केवटे याला औरंगाबादवरून नागपुरात आणण्यात आले होते. ताज्या मारहाणीच्या घटनेची धंतोली पोलिसांना माहिती देण्यात आली. तुरुंग अधिकारी करडे यांनी धंतोली पोलीस ठाण्यात केवटेने अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद करून त्यांना धमकावण्याची तक्रार दाखल केली. केवटे हा तुरुंग अधिकाऱ्यांच्या तक्रारी करीत आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याच्या विरुद्ध तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)
मारहाणीमुळे कैद्याला हार्ट अटॅक
By admin | Published: September 24, 2015 3:22 AM