नागपूर : एका २६ वर्षीय तरुणाचा नुकताच हृदय बंद पडल्यामुळे मृत्यू झाला तर, दुसऱ्या एका धक्कादायक घटनेत ७ वर्षीय मुलीला विमानामध्ये हृदयरोगाचा धक्का बसला. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडल्या. त्यापैकी ही दोन उदाहरणे. या घटनांमुळे तरुणांच्या जीवनशैलीविषयी विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यात हृदयाशी संबंधित प्रश्न मुख्य असून ते चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात लोकमतशी बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा यांनी विविध मुद्यांना हात घातला. तरुणांमध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित आजार पसरत आहेत. मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपान या वाईट सवयी तरुणांना घातक ठरत आहेत असे त्यांनी सांगितले. सात वर्षीय मुलीविषयी ते म्हणाले, संबंधित मुलीला हृदयाशी संबंधित आजार असेल. त्या आजाराचे निदान झाले नाही. तिला हृदयरोगाचा धक्का येण्याचा व विमानाचा काहीच संबंध नसावा असे त्यांनी नमूद केले. काही रुग्णांना हृदयाशी संबंधित आजार असतात, पण त्यांना त्याची माहिती नसते. त्या आजाराचे कधीच निदान झालेले नसते. दरम्यान, त्यांना जास्त शारीरिक परिश्रम झाल्यास हृदय बंद पडून मृत्यू होतो. मैदानी खेळाडूंच्या बाबतीत अशा घटना नेहमीच घडतात अशी माहिती त्यांनी दिली.
--------------
सक्रिय जीवनशैलीची गरज
हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यासाठी आरोग्यवर्धक जीवन जगणे आवश्यक आहे. परीक्षा व कामाचा मानसिक ताण, चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही हृदयरोगाची मुख्य कारणे आहेत. हृदयरोगाला दूर ठेवण्यासाठी हृदयाला आराम देणे गरजेचे आहे, असे डॉ. अर्नेजा यांनी सांगितले.
------------------
छोटी कोरोनरी आर्टरीही कारणीभूत
बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश देवपुजारी यांनीही तरुणांमधील वाढत्या हृदयरोगावर चिंता व्यक्त केली. तरुणांमधील हृदयरोगाला चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे. याशिवाय, भारत, पाकिस्तान, बांगलादेश यासह काही देशांमधील नागरिकांची कोरोनरी आर्टरी लहान असतात. त्यामध्ये फॅट गोळा झाल्यास हृदयरोग होतो. अलीकडच्या काळात अशा आजाराचे निदान वाढले आहे. पूर्वीही तरुणांचे हृदयरोगाने मृत्यू व्हायचे, पण त्याची माहिती होत नव्हती, असे डॉ. देवपुजारी यांनी सांगितले.
--------------
स्क्रीनपुढे काही खाऊ नका
मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर इत्यादींसोबत कमी वेळ घालवणे आवश्यक आहे. सध्या तरुणांमध्ये आरोग्याविषयी निष्काळजीपणा दिसून येतो. ते शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देत नाहीत. ते सतत स्क्रीनपुढे असतात. स्क्रीनपुढे बसून खातात. त्यामुळे पोटात किती प्रमाणात अन्न जात आहे हे कळत नाही. पालकांनी याकडे लक्ष द्यायला हवे, असे डॉ. देवपुजारी यांनी सांगितले.
----------------------
हृदयरोगात ५० टक्के वाढ
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार, १९९० ते २०१६ या काळात हृदयरोगामध्ये ५० टक्के वाढ झाली. देशात होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी १७ टक्के मृत्यू हृदयरोगाने हाेतात. याशिवाय २५ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये वाढत असलेला हृदयरोग भारतासाठी चिंतेचा विषय झाला आहे.
-------------------
हृदयरोगापासून दूर राहण्याचे मार्ग
क्रियाशील राहणे
आरोग्यवर्धक अन्न सेवन करणे
तणावमुक्त राहणे
कौटुंबिक इतिहास माहिती करणे
नियमित आरोग्य तपासणी करणे
धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे