लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोह हा शरीरात ऑक्सिजनचे अभिसरण होण्यात मदत करणारा अत्यावश्यक क्षार आहे. मात्र, शरीरात लोहाचे प्रमाण योग्य राखण्याचा समतोल साधणे कठीण असते. लोहाची पातळी कमी झाल्यास लोहाची कमतरता (आयडी) किंवा अॅनिमिया किंवा दोन्ही होऊ शकते. ‘हार्ट फेल्युअर’च्या रुग्णामध्ये हे दोन्ही विकार एकाच वेळी आढळून येतात. एका अभ्यासानुसार, ‘हार्ट फेल्युअर’च्या चारपैकी तीन रुग्णांमध्ये लोहाची कमतरता आढळते. यामुळे लोहाच्या कमतरतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन नागपुरातील हृदयरोग तज्ज्ञांनी आयोजित पत्रपरिषदेतून केले.हृदयरोग तज्ज्ञ अझिझ खान म्हणाले,जगात दोन अब्जांहून लोकांमध्ये लोहाची कमतरता आढळून येते. ‘हार्ट फेल्युअर’ म्हणजे हृदयाची पंप करण्याची क्षमता कमजोर होणे. यामध्ये रुग्णाचा अचानक मृत्यू धोका संभावतो. अशा आजाराच्या रुग्णांमधील लोहाची कमतरता ही एक वाढत जाणारी अवस्था असते. यामध्ये लाल रक्तपेशींची संख्या कमी होते, शिवाय त्या आकारमानानेही लहान होत जातात. त्यामुळे अॅनिमिया होतो व अॅनिमियामुळे हृदय प्रसरण पावते. परिणामी, रक्तातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी हृदयाला अधिक पंपिंग करावे लागते. यामुळे हृदयाचे काम वाढते आणि ‘हार्ट फेल्युअर’चा धोकाही वाढतो. आहारातील लोहाची जीवशास्त्रीय उपलब्धता कमी असल्याने, लोह कमी प्रमाणात घेतले जात असल्याने तसेच लोह शोषून घेण्याची क्षमता कमी असल्यानेही ‘आयडी’ होण्याची शक्यता असते. ‘हार्ट फेल्युअर’च्या रुग्णांमध्ये ‘आयडी’चे विकार ३०-५० टक्के आढळते. विशेष म्हणजे,‘आयडी’मुळे हृदयाच्या स्नायूंच्या कार्यात बिघाड होत असल्याने ‘क्लिनिकल’ उपचारांचा प्रभाव कमी होतो आणि मृत्यूचा धोका वाढतो. यामुळे आयडीचे अचूक निदान करून उपचाराखाली येणे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले.हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिल जवाहिरानी म्हणाले, इस्पितळाच्या बाह्यरुग्ण विभागात १० ते १५ टक्के रुग्ण हे ‘हार्ट फेल्युअर’चे असतात. यातील ५०-६० टक्के रुग्णांमध्ये ‘आयडी’ आढळून येतो. ‘आयडी’चे प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक आहे. मात्र, स्त्री-पुरुष दोहोंच्या आरोग्यावर ‘आयडी’मुळे सारखेच दुष्परिणाम होतात. ‘हार्ट फेल्युअर’ व ‘आयडी’ या दोन्ही विकारांनी ग्रासलेल्या रुग्णाची अवस्था अधिक गुंतागुंतीची होते. कारण, हृदयाच्या झडपांची अधिक वेगाने व अधिक वारंवारतेने हानी होते. अशा रुग्णांना वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागते. सध्या उपलब्ध असलेल्या विविध उपचारांचा विचार करता, हार्ट फेल्युअरच्या रुग्णांना ‘इंट्राव्हेन्युअस’ (आयव्ही) मार्गाने लोह देणे हा सर्वाधिक प्राधान्य असलेला उपचार आहे.
लोहाची कमतरता असल्यास हार्ट फेल्युअरचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:11 PM
लोहाची पातळी कमी झाल्यास लोहाची कमतरता (आयडी) किंवा अॅनिमिया किंवा दोन्ही होऊ शकते. ‘हार्ट फेल्युअर’च्या रुग्णामध्ये हे दोन्ही विकार एकाच वेळी आढळून येतात.
ठळक मुद्देवेळीच निदान व उपचार आवश्यकतज्ज्ञांचा सूर