नागपूर : उजवीकडे हृदय असलेला तरुण लष्करात भरती होऊ शकत नाही. लष्करात सेवा देण्याकरिता उच्च दर्जाची शारीरिक सुदृढता आवश्यक असते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले, तसेच उजवीकडे हृदय असलेल्या तरुणाला शिपाई (नर्सिंग सहायक) पदाकरिता अपात्र ठरविण्याचा शिपाई भरती अधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला.
न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांनी हा निर्णय दिला. संबंधित तरुण भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. जन्मत: उजवीकडे हृदय असण्याच्या अवस्थेला वैद्यकीय भाषेमध्ये 'डेक्सट्रोकार्डिया वुईथ साइटस इनवर्सस' म्हटले जाते. या तरुणाच्या हृदयाची जन्मत: अशी अवस्था आहे. ऑगस्ट २०१८मध्ये लष्करातील विविध पद भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर या तरुणाने शिपाई (नर्सिंग सहायक) पदाकरिता अर्ज सादर केला होता. त्यानंतर वैद्यकीय चाचणीमध्ये तो 'डेक्सट्रोकार्डिया'ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे नागपूर विभागीय शिपाई भरती अधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबर २०२० रोजी त्याला अपात्र ठरविले.
दरम्यान, तरुणाने तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमाणपत्र आणले, तसेच अपात्रतेच्या आदेशावर पुनर्विचार करावा, असे निवेदन सादर केले. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, तरुणाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने लष्कराच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल लक्षात घेता या तरुणाला लष्करात भरती करण्याचे निर्देश दिले जाऊ शकत नाहीत, असे स्पष्ट केले.
असा आहे नियम
- लष्कर सेवेचे निकष नागरी सेवेपेक्षा भिन्न आहेत. लष्करामध्ये अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते. त्याकरिता उच्च दर्जाच्या शारीरिक सुदृढतेची गरज असते.
- या तरुणाची शारीरिक अवस्था सामान्य व्यक्तीसारखी नाही. करिता, त्याला लष्करात भरती केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सांगितले.