नागपूर: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) लवकरच हृद्य प्रत्यारोपण केंद्र सुरू होणार आहे. हे केंद्र सुरू करण्यासाठी तिरूपतीच्या श्री व्यंकटेश्वरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल विज्ञान या संस्थेसोबत ‘एम्स’ने सामंजस्य करार केला आहे. प्रत्यारोपणासाठी आरोग्य विभागाची परवानगी येताच शस्त्रक्रियेला सुरुवात होणार आहे. असे झाल्यास हृद्य प्रत्यारोपण करणारे दिल्ली एम्स नंतर नागपूरचे ‘एम्स’ दुसरे ठरणार आहे.
नागपुरात मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाची संख्या वाढत आहे. विदर्भच नव्हे तर राज्यातून रुग्ण नागपुरात येवून हे प्रत्यारोपण करीत आहे. ‘एम्स’मध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणासोबतच मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ घातले आहे. आता यात हृद्य प्रत्यारोपणाची भर पडणार आहे. प्रत्यारोपणासाठी एम्सच्या हृद्य शल्यचिकित्सक विभागात निष्णांत डॉक्टरांचा चमू सोबतच आवश्यक पायाभूत सोयी सज्ज आहेत. प्रत्यारोपण करण्यासाठी आरोग्य विभागाची मंजुरी आवश्यक असते. त्यांना प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
बुधवारी ‘एम्स’चे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंथा राव यांनी हृद्य प्रत्यारोपणासाठी तिरूपतीा संस्थेसोबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी संस्थेचे संचालक आणि कुलगुरू डॉ. आर. व्ही. कुमार यांनीही करारावर स्वाक्षरी केली. ‘एम्स’मध्ये नुकतेच ‘हार्ट फेल्युअर’ क्लिनिक सुरू झाले आहे. या क्लिनिकमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना एकाच ठिकाणी विविध विभागाच्या सेवा तातडीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तिरूपतीच्या संस्थेसोबत झालेल्या कारारमध्ये नागपूर एम्समधील हृदयरोग शल्यचिकित्सकांना आवश्यक प्रशिक्षणासह, तांत्रिक मदत, संशोधन आणि इतरही सोय उपलब्ध करुन देण्यासाठी मदत केली जाणार आहे. या करारासाठी ‘एम्स’चे संचालक डॉ. राव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार व हृद्य शल्यचिकित्सा विभागाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.