नागपूर : 'अवयवदान हेच श्रेष्ठ दान' असं आपण नेहमीच वाचतो, ऐकतो याबाबत बोलतो. नागपुरातही एका तरुणामुळे चार जणांना नवजीवन प्राप्त झाले आहे. एका गंभीर अपघातात त्याचा मेंदू मृत झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या शरीरातले इतर अवयव हे अनेकांचे प्राण वाचवू शकतात याची जाणीव करून दिली आणि कुटुंबियांनी याला होकार दिला.
एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या मध्य प्रदेशच्या बैतुल येथील तरुणाचा उपचारादरम्यान मेंदूमृत झाला. संयम आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवत तरुणाच्या कुटुंबाने अवयवदानाला होकार दिल्याने नागपूरहून हृदय मुंबईला गेले. यासह दोन मूत्रपिंड व यकृताच्या दानामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळाले.
विजय शिवनारायन घंगारे (२७) रा. जोगळी, जि. बैतुल, मध्य प्रदेश असे मेंदू मृत रुग्णाचे नाव आहे. विजय व्यवसायाने शेतकरी होता. १५ ऑक्टोबर रोजी शेतीवरून घरी परत येत असताना त्याचा अपघात झाला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याच्यावर बैतुलच्या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. परंतु विजयची प्रकृती खालावत असल्याचे पाहत नातेवाइकांनी नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असताना २० ऑक्टोबररोजी विजयचे मेंदू मृत झाल्याचे निदान झाले. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. सोबतच अवयव दानाचाही सल्ला देण्यात आला. त्यांच्याकडून होकार येताच अवयव प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात समन्वयक वीणा वाठोडे यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
१८ वर्षीय तरुणाला हृदयाचे दान
विजयचे हृदय मुंबईच्या १८ वर्षीय तरुणाला दान करण्यात आले. यासाठी मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयातील डॉक्टरांची चमू आली होती. विशेष विमानाने हे हृदय मुंबईला गेले. या शिवाय, वोक्हार्ट रुग्णालयातील ६० वर्षीय पुरुषला मूत्रपिंड, केअर रुग्णालयातील २८ वर्षीय तरुणाला दुसरे मूत्रपिंड तर किंग्जवे रुग्णालयातील एका ३० वर्षीय महिलेला यकृत दान करण्यात आले.
वर्षातील दहावे अवयवदान
मागील दीड वर्षांत कोरोनामुळे अवयवदानाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु यावर्षी हे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. गुरुवारी १० वे मेंदूमृत रुग्णांकडून अवयवदान झाले. आतापर्यंत नागपूर विभागात ७७ मेंदूमृत रुग्णांकडून अयवदान झाले आहे.