नागपूर : दोन भाऊ आणि दोन बहिणींसोबत साडेतीन वर्षांची चिमुकली निलम शुक्रवारी खेळत होती. अचानक तोल जाऊन ती पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली अन् नाकातोंडात पाणी गेल्यामुळे तीने प्राण सोडला. शोधाशोध केल्यानंतर तिच्या पालकांना आपली चिमुकली खड्ड्यात पडलेली आढळली अन् निलमची आई द्वारकादेवी हिने हंबरडा फोडला. सर्वात लहान मुलगी आणि बोबडे बोल बोलणारी आपल्या लाडक्या परीने जगाचा निरोप घेतलेला पाहून तिच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली.
विजयकुमार रजक हे मुळचे छत्तीसगडमधील जेवर येथील रहिवासी त्यांच्या कुटुंबात पत्नी द्वारकादेवी दोन मुले आणि तिन मुली. पोटाची खळगी भरण्यासाठी ते छत्तीसगडमधून नागपुरात आले. येथे कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कवठा येथील विटाभट्टीवर दोघाही पती-पत्नीला काम मिळाले. त्यामुळे तेथेच झोपडी उभारून ते आपल्या मुला-बाळांसह मागील दोन महिन्यांपासून राहु लागले होते. साडेतीन वर्षांची निलम ही त्यांची सर्वात लहान मुलगी. बोबडे बोलत असल्यामुळे दोघाही पती-पत्नीच्या गळ््यातील ती ताईत होती. आईवडिल कामात असताना शुक्रवारी निलम आपल्या बहिण-भावांसह खेळत होती. खेळता-खेळता निलम पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ गेली. तेथे तोल गेल्यामुळे ती खड्ड्यात पडली. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे या चिमुकलीचा जीव गेला.
इकडे बराच वेळ होऊनही चिमुकली निलम दिसत नसल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिचा शोध सुरु केला. शोधता-शोधता ते पाण्याने भरलेल्या खड्ड्याजवळ आले असता त्यांना चिमुकल्या निलमला मृतदेहच दिसला. त्यांनी पाण्यातून तिला बाहेर काढले आणि धावपळ करीत मेयो रुग्णालय गाठले. परंतु तो पर्यंत निलमने या जगाचा निरोप घेतला होता. मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून कोराडीचे ठाणेदार रवि नागोसे यांच्या मार्गदर्शनाखाली युगल सेलुकर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मेयो रुग्णालयात शवविच्छेदन करून निलमचा मृतदेह तिच्या आई-वडिलांना सोपविण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत कामठी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात चिमुकल्या निलमवर अंत्यसंस्कार करण्यातआले.