नागपूर : फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सूर्याचा पारा चढायला लागला असून, उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले आहेत. दिवसाचे तापमान ३७ अंशांवर पाेहोचले आहे. रात्रीच्या गारव्याने उष्णतेचा समताेल राखला हाेता; पण आता किमान तापमानही चढायला लागले आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सूर्याचा तडाखा वाढेल, असा अंदाज आहे.
नागपूरला २४ तासांत दिवसाच्या तापमानात १.१ अंशाची घसरण हाेत रविवारी ३५.२ अंशाची नाेंद करण्यात आली. तरीही हे तापमान सरासरीपेक्षा २.६ अंशाने अधिक आहे. रात्रीचे तापमान १६.६ अंशावर असल्याने बाहेर काहीसा गारवा जाणवत आहे. पुढच्या आठवडाभरात किमान तापमान १९ अंशावर पाेहोचण्याचा अंदाज आहे. दिवसाचा पाराही ३८ अंशांवर पाेहोचण्याचा अंदाज आहे. दरम्यान, विदर्भातही ऊन तडकायला लागले आहे. ३८.२ अंशांसह अकाेला सर्वाधिक उष्ण ठरला आहे. यासह अमरावती व ब्रम्हपुरी ३७ अंशांच्यावर, चंद्रपूर व गाेंदिया ३६ अंशांच्यावर तसेच वर्धा व यवतमाळ ३५ अंशांच्यावर पाेहोचला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे. रात्रीचा पाराही चढायला लागला असून, बाहेर गारवा असला तरी घरात उष्णता जाणवत असल्याने कुलर सुरू झाले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. दुसरीकडे २८ फेब्रुवारीपासून हिमालय क्षेत्रात पश्चिम झंझावात तयार हाेत आहे. त्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात आकाशात ढगांची गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे हाेळीच्या वेळी पाऊस हाेण्याचीही शक्यता राहू शकते. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी संपूर्ण विदर्भाला उन्हाळ्यात उष्ण लाटांच्या झळा साेसाव्या लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.