नागपूर : साेमवारी विदर्भातील जिल्ह्यांचे कमाल तापमान अंशत: खाली आले खरे पण उष्णतेच्या झळांनी आजही नागरिकांची हाेरपळ केली. रविवारी अनेक शहरात ४४ अंशावर असलेला पारा साेमवारी त्याखाली आला खरा पण उन्हाची तीव्रता सारखीच हाेती. ७ मे म्हणजे मंगळवारपासून बहुतेक जिल्ह्यात वादळ वाऱ्याचे सावट असून उन्हापासून थाेडा दिलासा मिळेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
साेमवारी केवळ ब्रम्हपुरीचे तापमान वधारले व विदर्भात सर्वाधिक ४४.१ अंशाची नाेंद येथे झाली. इतर शहरातील तापमान मात्र अंशत: कमी झाले. रविवारी ४४ अंशाच्यावर असलेला अकाेला, वर्धा, चंद्रपूरचा पारा २४ तासात त्या खाली येत अनुक्रमे ४३.७, ४३.५ व ४३.६ अंशावर उतरला. इकडे नागपूरचे तापमानही ४३ अंशावरून ४२.६ अंशावर खाली आले. याशिवाय यवतमाळ, गडचिराेलीत ४२, गाेंदिया ४१.४ अंशाची नाेंद झाली.तापमान खाली आले असले तरी उन्हाच्या चटक्यांची तीव्रता तेवढीच हाेती. दुपारी घराबाहेर पडल्यावर शरीराला झळा बसत हाेत्या. त्यामुळे चाकरमान्यांनी उन वाढण्यापूर्वी कार्यालय गाठण्यात धन्यता मानली. रविवारी नीट परीक्षेमुळे रस्त्यावर असलेली गर्दी साेमवारी जाणवली नाही.