नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेनं कहर केला आहे. तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर असून उन्हाचे चटक्यात घराबाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे. दरम्यान, शहरात गेल्या ३-४ दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी ४ व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यूउष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
६,७ व ८ जून रोजी नागपुरातील चार विविध भागात चार व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. त्यांना रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ६ जून रोजी ५० वर्षीय व्यक्ती गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीतील अशोक चौकात बेशुद्धावस्थेत सापडला. तर, ७ जून रोजी गड्डीगोदाम भागात एक व्यक्ती बेशुद्ध आढळून आला. ८ जूनला सदर पोलीस ठाणे अंतर्गत छावणी बस स्थानक परिसरात ४५ वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. त्याच दिवशी अजनी पोलीस हद्दीतील टीबी वार्ड परिसरात ३७ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध आढळला. या सर्वांना रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या चौघांचाही मृत्यू उन्हाच्या तीव्रतेने झाला असल्याची शक्यता डॉक्टर व पोलिसांनी वर्तवली असून नेमके कारण शिवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतर स्पष्ट होईल.
दरम्यान, नागपुरात गेल्या चार-पाच दिवासांपासून उन्हाने चांगलाच कहर केलाय. उपराजधानीसह संपूर्ण विदर्भ उन्हाच्या तीव्र झळा सोसत आहे. नागरिक मान्सूनची वाट पाहत आहेत. हवामान विभागाच्या मते, पुन्हा आठवडाभर तरी मान्सूनचा स्पष्ट अंदाज नाही. मात्र, उष्ण वारे वाहणे कमी होत असल्याने आता ऊन लागण्याचा धोका बराच कमी झाला आहे. पुढील पाच दिवस आकाशात ढग दाटलेले राहतील. काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.