नागपूर : नवतपाचा दुसरा दिवसही विदर्भवासियांची परीक्षा घेणारा ठरला. सूर्य जणू विदर्भात मुक्कामी असावा व त्याच्या ज्वाळा थेट येथे पाेहचाव्या असे काहीसे वातावरण नागरिक सध्या अनुभवत आहेत. देशात राजस्थान व मध्य प्रदेशनंतर विदर्भात तापमान अलर्ट माेडवर पाेहचले आहे. यवतमाळात पारा ४६.६ अंशावर उसळला असून ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बराेबरी केली आहे.
रविवारी पूर्व राजस्थानच्या फालाेडी शहरात देशात सर्वाधिक ५० अंश तापमानाची नाेंद झाली आहे. मध्य प्रदेशातील अनेक शहरे उन्हाने हाेरपळले आहेत व हीच अवस्था विदर्भाचीही आहे. बुलढाणा व चंद्रपूर वगळता सर्वच जिल्ह्यात तापमानाने उसळी घेतली. अकाेल्यात आंशिक घट झाली असली तरी सरासरीपेक्षा ३ अंशाने अधिक असलेला पारा ४५.२ अंशावर आहे. ब्रम्हपुरीमध्ये एका अंशाची वाढ हाेत तापमान ४५ अंशावर उसळले.
गाेंदियातही रविवारी २४ तासात अचानक ४.२ अंशाची वाढ हाेत पारा ४४.४ अंशावर पाेहचला. दुसरीकडे ४४ अंशाच्यावर तापमानासह अमरावती, वर्धा ही शहरेही सूर्य झळांनी हाेरपळली आहेत. भंडारा, वाशिम, चंद्रपूर व गडचिराेलीत पारा ४३ अंशाच्यावर आहे. केवळ नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाने सूर्यकिरणांची वाट राेखली, मात्र उकाड्याने शरीरातून घामाच्या धारा काढल्या. दुपारी पावसाचे थेंब पडले पण फार काळ अस्तित्व राहिले नाही.
४४ ते ४९ अंशापर्यंत वाढेल पारादरम्यान हवामान विभागाने राजस्थान व मध्य प्रदेशसह विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमान ४४ ते ४९ अंशापर्यंत वाढण्याचा इशारा दिला आहे. नवतप्याच्या दाेन दिवसात त्याची चाहुल दिसून आली. उष्ण लाटेचा अलर्ट २९ मे पर्यंत देण्यात आला आहे. यंत्रणांनी उपाययाेजनांसाठी अलर्ट राहण्याचा हा इशारा हाेय. त्यानंतर १ जूनपर्यंत उन्हाचा तडाखा अधिक राहणार आहे.