नागपूर : नवतपाची तीव्रता दिवसागणिक वाढायला लागली असून विदर्भातील नागरिकांची हाेरपळ हाेत आहे. सूर्याने विदर्भावर वक्रदृष्टी फिरविली असून बहुतेक शहरे उष्ण लाटेच्या प्रभावात आले आहेत. साेमवारी ब्रम्हपुरीत ४७.१ अंश तापमानाची नाेंद झाली आहे. नागपूरचा पाराही यंदा पहिल्यांदा ४५.६ अंशावर उसळला असून घराबाहेर पडलेल्यांना भाजून निघाल्याचा अनुभव हाेत आहे.
गेल्या काही दिवसात राजस्थान व मध्य प्रदेशनंतर विदर्भवासियांना भयंकर उष्ण लाटांचा सामना करावा लागताे आहे. नवतपाचा तिसरा दिवस आणखी ताप देणारा ठरला. साेमवारी अकाेला व यवतमाळचा पारा ३ अंशाने घसरल्याने तिकडे दिलासा मिळाला. तिकडे घटला पण पूर्व विदर्भात पारा उसळला. ब्रम्हपुरी २.१ अंशाने वाढून ४७.१ अंशावर पाेहचले, जे यंदाच्या सिजनमध्ये विदर्भात सर्वाधिक आहे. नागपूरकरांनाही तीव्र उन्हाच्या झळांचा सामना करावा लागताे आहे. येथे अंगाची लाही लाही करणारा पारा ३.२ अंशाने उसळून ४५.६ अंशावर पाेहचला. हे तापमान २०१३ नंतर मे महिन्यात दशकातील सर्वाधिक ठरले आहे.
नागपूर खालाेखाल अमरावती व वर्धा ४५ अंशावर उसळला. त्यानंतर भंडारा, गाेंदिया, गडचिराेली, चंद्रपूर ४४ ते ४५ अंशाच्या स्तरावर उसळले आहेत. हवामान विभागाने २९ मे पर्यंत विदर्भावर उष्ण लाटांचा कहर बरसण्याची व कमाल तापमान ४४ ते ४९ अंशापर्यंत वाढण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार सूर्याने नागरिकांना अक्षरश: हाेरपळून काढले आहे. बुलढाणा, वाशिम वगळता सर्व जिल्हे सरासरीच्या वर गेले आहे. दिवसासाेबत रात्रीचेही तापमान सरासरीच्या कमीअधिक प्रमाणात असून रात्रीही उष्ण लहरी अनुभवाव्या लागताहेत. नागरिकांना पुढचे दाेन दिवस असेच कठीण जातील, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.