लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात संपूर्ण विदर्भात जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता आहे. त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यांत यलाे अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेईल. यानंतर तीन-चार दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.
रविवारी नागपुरात चांगला पाऊस झाला. सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू हाेता. दिवसभर ऊन तापले हाेते पण दुपारी ४ नंतर वातावरणाने कुस बदलली आणि काळ्याभाेर ढगांची गर्दी हाेत पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही काळ कधी जाेरात तर कधी हलक्या सरी सुरू हाेत्या. सायंकाळी ५.३० पर्यंत ६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, शनिवारीही पावसाने हजेरी लावली. सकाळपर्यंत ४ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील रामटेक, काटाेल तालुक्यात पावसाची तीव्रता अधिक आहे. विदर्भात अमरावती व गाेंदियात पावसाने चांगला जाेर धरला. सकाळपर्यंत अमरावतीत ३८ मिमी आणि गाेंदियात ३५.२ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. गाेंदियात रविवारी दिवसभरही पावसाचा जाेर कायम हाेता. सायंकाळपर्यंत ३२ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. यवतमाळलाही ढगाळ वातावरण हाेते. येथे ६ मिमी पाऊस झाला.
विदर्भातील सर्व जिल्ह्यांत साेमवारीही पावसाचा जाेर कायम राहणार आहे. साेमवारी सर्वदूर चांगला पाऊस हाेण्याची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस हाेईल. हे वातावरण १४ सप्टेंबरला कायम राहील आणि बहुतेक भागात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेईल. त्यानंतर ढगाळ वातावरण कायम राहणार असले तरी पावसाचा जाेर काहीसा कमी हाेण्याची शक्यता आहे. दाेन दिवसांच्या पावसामुळे मान्सूनचा बॅकलाॅग पूर्ण हाेईल, अशी शक्यता हवामान जाणकारांनी व्यक्त केली.