नागपूर : हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला हाेता. अंदाजानुसार जाेरदार हजेरी लागली नसली तरी दिवसभर चाललेली रिपरिप आणि सायंकाळी झालेल्या चांगल्या सरींनी नागपूरकरांना भिजविले.
सकाळपासून आकाशात काळ्या ढगांची गर्दी जमली हाेती. त्यामुळे दमदार हजेरी लागेल, अशी परिस्थिती हाेती. मात्र दिवसभर पावसाचा वेग वाढला नाही. मात्र दिवसभर थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांची तारांबळही उडत हाेती. दुपारी चार वाजताच्या दरम्यान जाेरात सरी बरसल्या. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत १२ मि.मी. पावसाची नाेंद झाली. सायंकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा पावसाने जाेर धरला व जवळपास तासभर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रात्री ८.३० पर्यंत पुन्हा १५ मि.मी. पावसाची भर पडली. रात्रीही ढगांचा जाेर कायम हाेता. मात्र पुढचे दाेन दिवस पावसाचा जाेर अधिक राहण्याची शक्यता वर्तवली असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. स्थिती अनुकूल असल्याने आणखी काही दिवस पावसाची तीव्रता कायम राहणार असल्याचे दिसते.
पावसाची तूट १६ टक्क्यांवर
सध्या नागपूर जिल्ह्यात पावसाची तूट १६ टक्क्यांवर आहे, जी सामान्य मानली जाते. पुढच्या काही दिवसांत ही भरून निघण्याची शक्यता आहे.
पुरात वाहून बैलजोडीचा मृत्यू
भिवापूर : शेतातून घराकडे निघालेली शेतकऱ्यांची बैलजोडी पुराच्या पाण्यात वाहून गेली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारासची आहे. तुळशीदार आंभोरे, रा. मालेवाडा असे पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. मालेवाडा शिवारातून वाहणाऱ्या चिचाळा नदीपलीकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. मंगळवारी संध्याकाळी शेतातील कामे आटोपल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या घराकडे जाण्यासाठी सोडून दिल्या. दरम्यान, सहा बैलजोड्या नदीच्या पाण्यातून पोहत बाहेर पडत असतानाच, तुळशीदास आंभोरे यांची बैलजोडी एकमेकांना बांधून असल्यामुळे तुडुंब भरलेल्या नदीपात्रातून बाहेर पडणे कठीण झाले. यातील एक बैल नदीपात्रातच मृत्युमुखी पडला तर दुसरा नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला. दोन्ही बैलांच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पारडगावात वीज कोसळून शेळ्या ठार
उमरेड : पारडगाव शिवारात मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वीज कोसळल्याने त्यात होरपळून सहा जनावरे ठार झाली. यामध्ये चार शेळ्या आणि दोन बोकडांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी शंकर नथ्थूजी राऊत यांनी शेतालगतच्या झुडपी भागात जनावरे चराईसाठी नेली होती. दरम्यान, दुपारी वाजताच्या सुमारास वीज कोसळली. यामध्ये पाच शेळ्या आणि एक बोकड ठार झाले. शंकर राऊत यांच्याकडील चार शेळ्या, तर तुकाराम राऊत आणि दीपक अरतपायरे यांच्याकडील प्रत्येकी एका बोकडाचा यात समावेश आहे. घटनेनंतर सायकी येथील तलाठी रोशन बारमासे यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात दोन मजूर होते. ते या नैसर्गिक संकटातून थोडक्यात बचावल्याचे समजते.