नागपूर : उपराजधानी नागपूर येथे सकाळी साडेआठ वाजल्यापासून अवघ्या सहा तासात विक्रमी २६३.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुढील ४८ तासातदेखील मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून नागपुरातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे विधानभवानाच्या कामकाजावरही परिणा झाला आहे.
उपराजधानी नागपुरमध्ये गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूरमधील अनेक भागांमधील वीजपुरवठादेखील खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसाचा फटका विधीमंडळाच्या कामकाजालादेखील बसला आहे. आठवडाभर ओढ दिल्यानंतर काल रात्रीपासून वरुणराजानं नागपूर शहराला झोडपण्यास सुरुवात केली. गुरुवारी रात्री नागपुरात पावसाची संततधार सुरू होती. सकाळी आठनंतर पावसाचा जोर वाढला. नागपूरकरांना आज फार काळ सूर्याचं दर्शनही घडलं नाही. दिवस सुरू होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं. अनेकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्यानं सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. काल सकाळी 8 ते आज सकाळी 8 या कालावधीत नागपुरात 61.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढील आठवडाभर नागपुरमध्ये पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.Live Updates:
- नागपुरात 263 मिमी पावसाची नोंद.
- नागपुरातील शाळांना शनिवारी सुट्टी जाहीर.
- शहरात मुसळधार पाऊस.
- स्मार्ट अण्ड सस्टेनेबल सिटी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला भेट; पाणी तुंबलेल्या भागांची पाहणी.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात; विमानतळातून बाहेर पडणारा रस्ता पूर्ण पाण्याखाली.
- अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं सर्वसामान्यांचे हाल.
- विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेच्या शासकीय निवासस्थानात शिरलं पाणी.