नागपूर : नागपुरात सोमवारी सकाळी जोराचा पाऊस झाल्याने विमानतळ परिसराला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शहरातील सखल भागातील वस्त्यात पाणी साचले आहे. लोकांच्या घरात पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले.नागपूर विमानतळापासून बाहेर येणा-या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे विमानतळावरून बाहेर येणा-या प्रवाशांना त्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करावे लागले आहेत.
सकाळी पडलेल्या एक -दिड तासाच्या दमदार पावसाने नागपूरच्या काही रस्त्यांनाच नदीचे स्वरूप आले होते. नागपूरच्या सोनेगाव पोलीस स्टेशनला मॉडेल पोलीस स्टेशन म्हणून विकसित करण्यात आले होते. त्या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोररून पाणी वाहत आहे. पोलिसांची वायरलेस रूम असो किंवा पोलीस निरीक्षकांची केबिन सर्वत्र पाणी शिरल्यामुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्या कार्यालयाच्या बाहेर बसून काम करीत आहेत.
सीताबर्डी येथील मोदी क्रमांक ३ मध्ये दुकात गटारचे पाणी शिरले. गारगोटी नगर नाल्याला पूर आल्याने लगतच्या वस्त्यात पाणी साचले. रामेश्वरी हावरा पेठ येथील लोकांच्या घरात पाणी साचले आहे. घरात साचलेले पाणी बाहेर काढावे लागले. मिनीमातानगर परिसरातील घरात गटारचे पाणी साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिक त्रस्त आहे. मानेवाडा रोड, ओंकांर नगर, गांधीबाग येथील औषध मार्केट आदी ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.