नागपूर : दोन आठवड्याच्या उसंतीनंतर परतलेल्या पावसाने पुन्हा रौद्र रूप धारण केले. शनिवारी रात्री विदर्भातील जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. सर्वदूर जोरात सरी बरसल्या असल्या तरी पूर्व विदर्भातील वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात धुवांधार पावसाचा जाेरदार फटका बसला.
नागपूर शहरात मध्यम पावसाची हजेरी लागली पण जिल्ह्यात कुही, मौदा तालुक्यांना जोरदार तडाखा दिला आहे. कुही तालुक्यात ११ सेमी तर मौदा तालुक्यात ७ सेमी पावसाची नोंद झाली. शनिवारी रात्रीपर्यंत वर्धा शहरात पावसाची कोसळधार चालली होती. रविवारी सकाळपर्यंत १४८.२ मि.मी. किंवा ९ सेमी. पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे जिल्ह्यातही पावसाचा तडाखा कायम होता.
याशिवाय हिंगणघाट (८ सेमी), समुद्रपूर (१० सेमी) या तालुक्यातही पावसाने तडाखा दिला. गडचिराेली शहरातही पावसाचे धुमशान चालले आहे. येथे १२५.४ मि.मी. म्हणजे ११ सेमी. पाऊस नोदविला गेला. जिल्ह्यात आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यात पावसाने धुवांधार बॅटिंग केली. चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती (९ सेमी), चिमुर (९ सेमी), वराेरा (९ सेमी), सिंदेवाही व सावलीत (७ सेमी) पावसाचे रौद्र रुप दिसून आले. यवतमाळ शहर व जिल्ह्यातील मारेगाव व नेर तालुक्याला सुद्धा पावसाचा फटका बसला. भंडारा शहर व पवनी तालुक्यातही पावसाने धुमशान घातले हाेते. जिल्ह्यातील गाेसीखुर्द धरणाचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत.
१५ दिवस दडी मारल्याने शेतातील खरीप पिकांना पावसाची प्रतीक्षा होती पण परतून झालेल्या जाेरदार पावसाचा या पिकांना तडाखा बसला आहे. अनेक तालुक्यातील शेती पाण्याखाली आल्याची माहिती आहे. काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती आहे. दरम्यान वातावरणीय प्रणालीमुळे पावसाची संभाव्यता आणखी एक दिवस वाढली असून हवामान खात्याने २१ ऑगस्टचाही येलाे अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर ढगाळ वातावरण व विजांचे गर्जन होण्याची शक्यता आहे. २३ ऑगस्टनंतर उघडीपीची शक्यता आहे.