लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी तालुक्यातील आसोली गावातील के जॉन पब्लिक स्कूलचे विद्यार्थी शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेतच अडकून पडले. ही मुले रात्रीपर्यंत शाळेत अडकून होती. पालक, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या प्रयत्नातून या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान शुक्रवारी सर्व शाळांना महालक्ष्मीची स्थानिक सुटी जाहीर केल्यानंतरही ही शाळा सुरु का ठेवण्यात आली? यासंदर्भात जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शाळेला खुलासा मागितला असून दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.आसोली येथील के जॉन पब्लिक स्कूल मध्ये नर्सरी ते १० वीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळी विद्यार्थी शाळेत पोहोचले दुपरी ११.३० नंतर पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसामुळे या शाळेसमोरील मुख्य मार्ग तसेच सभोवतालचा संपूर्ण परिसर हा पाण्याने वेढला. त्यामुळे शाळेत नियमित जाणारी स्कूल बस पोहोचणे शक्य होत नव्हते. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच अडकून पडले. दुसरीकडे बराच वेळ होऊनही मुले घरी न परतल्याने पालक चिंतेत पडले. त्यांनी शाळेत संपर्क साधला. तेव्हा परिस्थिती समजली. पालक शाळेत पोहोचले. तेव्हापर्यंत प्रशासनाचे अधिकरीही पोहोचले होते. पालक, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नातून मानवी साखळी तयार करून या विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी, मौदाचे पोलीस निरीक्षक गीते उपस्थित होते.अनेक विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत शाळेत अडकून होते. त्यांंच्या पालकांना शाळा व्यवस्थापकांकडून मोबाईलवर मॅसेज पाठवून कळविले जात होते. दरम्यान शाळांना सुटी असूनही शाळा व्यवस्थापकांनी शाळा सुरु ठेवून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल अनेक पालकांनी संताप व्यक्त केला आहे.चौकशी होणार, गुन्हा दाखल करूमहालक्ष्मीनिमित्त शुक्रवारी नागपुरातील सर्व शाळांना लोकल सुटी जाहीर करण्यात आली होती. यानंतरही के जॉन शाळा सुरु ठेवण्यात आली. संबंधित प्रकरणी तहसीलदार व अधिकऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. चौकशीचे आदेश देण्यात आले असून वेळ पडली तर शाळाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.अश्विन मुदगलजिल्हाधिकारी नागपूर