नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, यादिवशी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या कालावधीमध्ये पावसासोबतच वादळी वारा व वीज पडण्याची शक्यतादेखील भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आणखी काही दिवस असाच पाऊस राहील. वादळ वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यताही आहे. धरणे, नदी, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहताहेत. त्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यारी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना काहीही त्रास असल्यास किंवा मदतीसाठी नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष २५६२६६८ यावर, तसेच टोल फ्री क्र. १०७७ वर संपर्क साधावा.
- चौरई धरण भरले, पुराचा धोका
पेंच नदीवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेले चौरई धरणदेखील ८५ टक्के भरले असून, या कालावधीमध्ये छिंदवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १० ऑगस्ट रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या कारणास्तव या कालावधीमध्ये चौरई धरणातून पाण्याचा अतिविसर्ग होऊन तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणामध्ये अधिक पाणी येऊन पेंच व कन्हान नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे धरण तोतलाडोह-८८ टक्के, नवेगाव खैरी-९९ टक्के, खिंडसी-९६ टक्के, वडगाव-१०० टक्के क्षमतेने भरलेले आहे. मध्यम प्रकल्पात वेणा, कान्होली बारा, पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी, चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकडानाला व जाम हे १०० टक्के भरलेले असून, या ठिकाणी सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्वच लघु प्रकल्प १०० टक्क्यांनी भरलेले असून, त्या ठिकाणीदेखील सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.