नागपूर : विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असला तरी ऊन-पावसाचा खेळ चाललेला आहे. नागपुरात शनिवारी रात्री जाेरदार बरसल्यानंतर रविवारी सकाळपासून ऊन तापले हाेते. दुपारनंतर मात्र पुन्हा काळ्या ढगांची गर्दी हाेत पावसाच्या सरी बरसल्या. रात्रीपर्यंत थांबून थांबून रिमझिम सुरू हाेती. विदर्भात बहुतेक भागात हेच चित्र हाेते.
काही दिवसांच्या उघाडानंतर शुक्रवारी रात्रीपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने रविवारी रात्रीपासून पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या १० ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असला तरी असाच उघडझाप करीत १५ ऑगस्टपर्यंत पाऊस सक्रिय राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
शनिवारी रात्री नागपूर शहरात धुवांधार पाऊस झाला. रविवारी सकाळी ८.३० पर्यंत ४० मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. सकाळी मात्र ऊन पडले हाेते. दुपारी ३ वाजताच्यादरम्यान काळे ढग आकाशात जमा झाले आणि हलक्या सरींसह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ५.३० पर्यंत केवळ १ मि.मी. पाऊस नाेंदविला असला तरी रात्रीपर्यंत थांबून थांबून पावसाच्या सरी हाेत हाेत्या.
विदर्भात अमरावती, अकाेला वगळता इतर जिल्ह्यात पावसाची सक्रियता वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा येथे सर्वाधिक ६६.४ मि.मी. पावसाची नाेंद झाली. वर्ध्यात सकाळपासून १३ मि.मी तर यवतमाळात सायंकाळी ५.३० पर्यंत २४ तासात २१ मि.मी. पाऊस नाेंदविला. बुलडाण्यात सकाळपर्यंत ४८ मि.मी. पाऊस झाला. विदर्भात आतापर्यंत ७१३.३ मि.मी. पाऊस नाेंदविण्यात आला आहे. ९ व १० ऑगस्टला तीव्रता अधिक राहणार असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे.