राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत पावसाच्या कहरात एकूण ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नागपूर : जिल्ह्यातील दारे नसलेले एकूण १४ धरणे ओव्हर फ्लो झाले आहेत. तर, चार धरणाची दारे उघडण्यात आली आहे. एकूण लहान व मोठ्या १८ धरणांतून विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी परिसरात रविवारी नाल्याचा पूर ओलांडताना आई व मुलगी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. तर, मंगळवारी सावनेर तालुक्यात पुरात गाडी वाहून गेल्याने ६ जणांना जलसमाधी मिळाली. संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा नदीला पूर, अनेक रस्ते बंद, वाहतूक प्रभावित. राजुरा व कोरपना तालुक्यातील अनेक मार्ग बंद. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन.
गोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्यात अतिवृष्टी. आमगाव तालुक्यातील गिरोला सिंधीटोला पांगोली नदीवरील कच्चा पूल वाहून गेल्याने या गावांचा आमगाव तालुक्याशी संपर्क तुटला.
भंडारा : जिल्ह्यात २४ तासांत जोरदार पाऊस. २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद. गोसेखुर्द प्रकल्पाचे २८ गेट उघडले, ५ गेट एक मीटरने, तर २३ गेट अर्धा मीटरने उघडले, ४०९०.७ क्युमेक पाण्याचा विसर्ग. पवनी - बोरगाव रस्त्यावरील नाल्याच्या पुराचे पाणी पुलावर, सकाळपासून वाहतूक ठप्प. मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथे शेतात वीज कोसळून तरुण ठार. बुधवारी सकाळी ८.१५ वाजताची घटना. शुभम विजय लेंडे (२४) रा. मोहगाव देवी असे मृताचे नाव.
गडचिरोली : तेलंगणा सीमेवरील मेडीगड्डा प्रकल्पाचे (लक्ष्मी बॅरेज) सर्व ८५ गेट उघडले, १२,१०,६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, सिरोंचा तालुक्यातील शेती आणि गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता.
नदी-नाल्यावरील पूल ठरताहेत धोकादायक
पुलावरून पाणी जात असल्याचे दिसत असतानाही अनेकजण तो ओलांडण्याचा प्रयत्न करतात. चालक अतिआत्मविश्वासाने गाडी नेण्याचा प्रयत्न करतात. गाडीच्या चाकांमध्ये उच्च दाबाची हवा असते. दीड फुटावर गाडी जाताच ती तरंगू लागते व पुलाखाली फेकली जाते. त्यामुळे अशावेळी पूल ओलांडण्याचे धाडस करण्यापेक्षा पाणी ओसरण्याची वाट पाहिलेले बरे.