नागपूर : शनिवारी सायंकाळपासून बदललेल्या वातावरणामुळे रविवारी नागपूरसह विदर्भात बहुतेक जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. रात्री अनेक भागात मुसळधार पाऊस तर सकाळपासून रिपरिप सुरू हाेती. त्यामुळे आर्द्रता वाढली असून तापमान ६ ते १० अंशापर्यंत खाली घसरले. त्यामुळे १०-१२ दिवसांपासून गायब असलेल्या पावसामुळे वाढलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला.
उत्तर-दक्षिण मान्सून ट्रफ सध्या दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश हाेत काेमाेरिन एरियातून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र मार्गे कर्नाटककडे वळत आहे. शिवाय काेमाेरिन एरियामध्ये सायक्लाेनिक सर्क्युलेशन निर्माण झाले आहे. सूर्याचा ताप वाढल्याने प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. त्याच प्रभावातून गायब झालेल्या पावसाने पुनरागमन केले. शनिवारी सायंकाळपासून वातावरणाने कूस बदलली आणि नीरभ्र आकाशात पावसाचे काळे ढग तयार झाले. सकाळी ८.३० वाजतापर्यंत चंद्रपूरमध्ये ५४.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली. येथे रविवारी मात्र ढग शांत हाेते. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे विदर्भात सर्वाधिक ६१.६ मि.मी. पाऊस झाला. अकाेला, ब्रम्हपुरी, गडचिराेली, वाशिम, गाेंदिया, भंडारा या जिल्ह्यात हलक्या पावसाने हजेरी लावली.
दरम्यान रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू हाेती. नागपुरात दिवसभरात २६ मि.मी. पाऊस झाला. संपूर्ण जिल्ह्यात पाऊस झाला. जिल्ह्यात रामटेकला सर्वाधिक ३५.४ मि.मी. पाऊस झाला. याशिवाय वर्धा २५ मि.मी., अमरावती २४ मि.मी व यवतमाळ येथे २३ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार साेमवारी काही भागात असे वातावरण राहणार आहे.
दरम्यान पावसामुळे आर्द्रता ९० ते ९५ टक्केपर्यंत वाढली आहे. त्यामुळे दिवसाच्या तापमानात माेठी घट झाली. नागपूरचे तापमान ९.३ अंशाने घटले व शनिवारच्या ३५ अंशावरून २५.३ अंशावर आले. वर्धाचे (२५.८) तापमान १०.१ अंशापर्यंत घसरले. याशिवाय चंद्रपूर (२६.८) चे तापमाने ९.८ अंशाने, यवतमाळ (२६.५) चे ८.५ अंशाने, अमरावती (२७.२) चे ७.२ अंशाने तर गाेंदिया ७ अंश व अकाेला ६.९ अंशापर्यंत खाली घसरले. त्यामुळे उकाड्यापासून माेठा दिलासा मिळाला आहे.