लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ:
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात असलेल्या कवठाबाजार येथे जोरदार पाऊस झाला. पैनगंगा नदीच्या काठावर असलेले हे गाव पावसाच्या पाण्याने भरून गेले आहे. दिग्रस तालुक्यातही मध्यरात्रीपासून संततधार सुरू आहे. आर्णी तालुक्यातील अरुणावती, पैनगंगा, अडान नदीच्या काठावरील गावांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. उमरखेड तालुक्यातही पाऊस सुरू आहे. उमरखेड ते पुसद हा मार्ग पावसामुळे बंद झाला आहे. दहेगाव येथील नाल्याला पूर आला आहे. दारव्हा तालुक्यात गुरुवारी १२ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. नंतर थोडी उघाड मिळाली आहे.वर्धा जिल्ह्यात कोरा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाने इतक्या दिवसांपासून खंड दिल्याने शेतकरी चिंतेत होते. कापूस व सोयाबीन पिकाला पावसाची गरज होती. १५ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून येथे पाऊस सुरू आहे. परिसरातील विहीरी व नाले तुडुंब भरले असून पिकांवरील कीड वाहून गेल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.