नागपूर : रात्रभरापासून २४ तास विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब असलेल्या पावसाने रविवारपासून जाेरदार धडक दिली. ही संततधार साेमवारीही कायम हाेती. नागपूर, गडचिराेली, गाेंदियासह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पिकांचीही माेठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
हवामान विभागाने १४ सप्टेंबरपर्यंत येलाे अलर्ट जारी करीत जाेरदार पावसाचा इशारा दिला हाेता, जाे रविवारपासून सत्यात येत आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेली पावसाची बॅटिंग साेमवारीही कायम हाेती. बहुतेक जिल्ह्यांत ढगफुटी झाल्यागत पाऊस पडला. गडचिराेलीत सकाळी ८.३० पर्यंत तब्बल १५८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. दिवसभरही रिपरिप चालली हाेती व २० मि.मी. पाऊस नाेंदविला गेला. गाेंदियात साेमवारी दिवसभरात १२० मि.मी. पाऊस झाला. नागपुरात सोमवारी सकाळपर्यंत तब्बल ८३.१ मि.मी. पाऊस झाला. ही काेसळधार दिवसाही कायम हाेती. पहाटेपासून सुरू झालेली मुसळधार दुपारी १२ वाजेपर्यंत चालली हाेती. त्यानंतर थाेडी उसंत घेत पुन्हा रिपरिप सुरू झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६७ मि.मी. पावसाची नाेंद झाली. म्हणजे २४ तासांत १५१ मि.मी. पाऊस झाला.
यवतमाळमध्ये रात्री ७५ व साेमवारी दिवसभरात १६ मि.मी. पाऊस झाला. अमरावतीत रात्री ४६ व दिवसा ३० मिळून २४ तासांत ७६ मि.मी. पाऊस झाला. साेमवारी सकाळपर्यंत वाशिम ६२.८ मि.मी., बुलडाणा ६० मि.मी., ब्रम्हपुरी ४०.४ मि.मी., चंद्रपूर १६.८ मि.मी., अकाेला ३५.१ मि.मी. पर्यंत पाऊस झाला आहे. हा पाऊस सर्व जिल्ह्यांत सर्वत्र पडला आहे. चंद्रपुरात बल्लारपूर येथे १२५ मि.मी. झाला असून गाेंडपिपरी, पाेंभुर्णा, सावली परिसर प्रभावित झाला आहे. गाेंदियात अर्जुनी माेरगावला १३०.८ मि.मी. पाऊस झाला. पावसामुळे आर्द्रता १०० वर पाेहोचली असून, तापमानात माेठी घसरण झाली आहे.