नागपूर : नागपूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागाला आज जोरदार पावसाने झोडपून काढले. वादळासोबत आलेल्या या पावसाने शहरातील मार्गवरील झाडे पडली, फांद्या तुटून पडल्या. ग्रामीण भागात विजेचे खांब वाकले आणि घरांचे छतही उडाले. यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली.
दुपारी २ वाजतानंतर मेघगर्जना होऊन अचानकपणे पावसाला सुरू झाली. सुमारे पाऊण तास जोराचा पाऊस आला. पावसासोबत जोराचे वादळही सुटले. यामुळे दुकानदारांची आणि फेरीवाल्यांची चांगलीच पंचायत झाली. शहरात आलेल्या वादळामुळे वर्धा रोड परिसरातील मार्गावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महानगर पालिकेच्या पथकाने येऊन फांद्या हटविल्यावर मार्ग मोकळा झाला. शहरात सकाळी पावसाचे वातावरण नव्हते. मात्र दुपारनंतर अचानकपणे भरून आले. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस आला. हवामान खात्याने शहरातील दिवसभराच्या तापमानाची नोंद ३८.८ अंश सेल्सिअस केली आहे. सकाळी आर्द्रता ६९ टक्के होती. ती सायंकाळी १०० टक्के नोंदविली गेली.
...
ग्रामीण भागालाही तडाखा
ग्रामीण भागालाही या जोराच्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला. पोल तुटले, झाडे पडली, अनेक घरांचे कवेलू, टिनपत्रे उडून जीवनावश्यक साहित्याची प्रचंड नासधूस झाली. रामटेक तालुक्यातील नंदापुरी गावात अनेक घरांवरील पत्रे उडाली. रामटेक, मौदा रस्त्यावर झाडे तुटून पडल्याने वाहतूक तीन तास खोळंबली. कोंढाळी, बुटीबोरी, मौदा तालुक्यातील ग्रामीण भागालाही पावसाने झोडपले.
...