नागपूर : गेल्या सात दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. थांबून थांबून पडणाऱ्या काेसळधारांनी प्रत्येक जिल्ह्यात तडाखा दिला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत गडचिराेली, चंद्रपूरसह अकाेला, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यात धुवाॅंधार बरसात झाली. तर गुरुवारी दुपारी नागपूरकरांनाही पावसाने झाेडपले. पुढचे पाच दिवस आणखी अतिवृष्टी हाेईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारी सकाळपर्यंत गडचिराेलीत तब्बल १३८.४ मिमी पावसाची नाेंद झाली. जिल्ह्यातील अहेरी, कुरखेडा, मुलचेरा, भामरागड आदी तालुक्यांमध्येही पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक गावे पाण्याखाली आली आहेत व संपर्क तुटला आहे. येथे दिवसा मात्र पावसाने उसंत घेतली. चंद्रपूरमध्ये ९९.८ मिमी पाऊस सकाळपर्यंत झाला. दिवसा हलकी रिपरिप चालली हाेती. आज सकाळपर्यंत वाशिममध्ये ८४.४ मिमी तर यवतमाळला ४३ मिमी व अकाेला ४६.९ मिमी पाऊस झाला. रात्रीपासून आज सायंकाळपर्यंत २४ तासांत अमरावती २८.२ मिमी, बुलडाणा ४६ मिमी, गाेंदिया ३३.४ मिमी पावसाची नाेंद झाली. नागपूरला रात्री हलका पाऊस झाला व सकाळपासून रिपरिप सुरू हाेती. मात्र दुपारनंतर पाऊस धाे धाे बरसला. सकाळपासून १२.५ मिमी पाऊस दुपारनंतर ५२ मिमीवर पाेहोचला.
विदर्भात १४ जुलैपर्यंत सरासरी ३०७ मिमी पावसाची नाेंद हाेते पण यावेळी ४४ टक्के अधिक म्हणजे ४४१ मिमी पाऊस नाेंदविला गेला आहे. मराठवाड्यात यावेळी ८७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही दरवर्षीच्या सरासरीपेक्षा ४१ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
नद्यांच्या पाणलाेट क्षेत्रातही सरासरी पार
वैनगंगेच्या पाणलोट क्षेत्रात ५४४.३ मिमी पाऊस झाला असून ताे दरवर्षीच्या सरासरीपेक्षा ५७ टक्के अधिक आहे. त्यामुळे गाेसीखुर्द प्रकल्पाच्या सर्व ३३ दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्राणहिता नदीच्या क्षेत्रात १२७ टक्के अधिक असून ६६८.२ मिमी पाऊस नाेंदविला गेला. वर्धा नदी ४३ टक्के अधिक म्हणजे ४१२ मिमी, इंद्रावती नदीक्षेत्रात ५४५.५ मिमी नाेंद झाली असून ती सरासरीपेक्षा ४७ टक्के अधिक आहे.
पुढचे पाच दिवस अतिवृष्टी
ओडिसा व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शिवाय उत्तर अरबी समुद्र व गुजरातच्या किनारपट्टीवर सायक्लाेनिक सर्क्युलेशन व कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढचे २४ तास ते वाढणार आहे. त्यामुळे १८ जुलैपर्यंत विदर्भात टप्प्याटप्प्याने अतिवृष्टी हाेणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.