नागपूर : विदर्भातील वैनगंगा आणि वर्धा या दाेन्ही महत्त्वाच्या नद्या मध्य प्रदेश, छत्तीसगडमधून वाहत येतात. यावर्षी मध्य भारत हेच अतिपावसाचे केंद्र राहिले आहे आणि मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे. तिकडे अधिक पाऊस झाल्याने ते पाणी नद्यांवाटे वाहत येत आहे. यामुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा हे जिल्हे पुरामुळे अत्याधिक प्रभावित झाले आहेत.
विदर्भातही जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. एवढेच नाही तर नद्यांच्या पाणलाेट क्षेत्रातही अत्याधिक पाऊस झाला आहे. वैनगंगा नदीच्या पाणलाेट क्षेत्रात सरासरीपेक्षा ५९ टक्के अधिक पाऊस तर वर्धा नदीत सरासरीपेक्षा ४५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. याचीही भर नदीच्या पात्रात झाली असून दाेन्ही नद्यांना चारदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.