नागपूर : गेल्या ५-६ दिवसांपासून विदर्भात सर्वदूर पावसाने थैमान घातले आहे. नागपूरसह जिल्हाभरात पावसाचा धुमाकूळ सुरू असून नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. संततधार पावसामुळे नवेगावखैरी, नांद, वेना या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सावनेर, पारशिवनी, रामटेक, उमरेड, भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका संभवतो आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. रविवारी हिंगणा तालुक्यातील इसासनी परिसरात नाल्याचा पूर ओलांडताना आई व मुलगी वाहून गेल्याची घटना समोर आली होती. तर काल मंगळवारी सावनेर तालुक्यातील नांदागोमुख-छत्रापूर मार्गावरील ब्राह्मणमारी नदीला पूर आला होता. या पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही वाहनचालकाने स्कॉर्पिओ गाडी टाकण्याचे धाडस दाखवले. पाण्याचा प्रवाह एवढा तीव्र होता की स्कॉर्पिओ प्रवाहात येताच पुलावरून घसरली व पुरात वाहून गेली. चालकाच्या मूर्खपणामुळे त्याच्यासह आत अडकलेल्या सहा जणांना जलसमाधी मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. याच तालुक्यात कोलार नदीचा पूल ओलांडताना एकजण सायकल काठावर उभी करून पुलावरून पायी जायला लागला. व पाय घसरून पाण्यात पडून प्रवाहात वाहून गेला, रात्री उशिरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता.
पावसाचा कहर, नदी-नाल्यावरील पूल ठरताहेत धोकादायक
पुलावरून पाणी जात असल्याचे दिसत असतानाही अनेकजण तो ओलांडण्याचा प्रयत्न करतात. चालक अतिआत्मविश्वासाने गाडी नेण्याचा प्रयत्न करतात. गाडीच्या चाकांमध्ये उच्च दाबाची हवा असते. दीड फुटावर गाडी जाताच ती तरंगू लागते व पुलाखाली फेकली जाते. त्यामुळे अशावेळी पूल ओलांडण्याचे धाडस करण्यापेक्षा पाणी ओसरण्याची वाट पाहिलेले बरे.
अतिहुशारी जीवावर बेतु शकते
सावनेर तालुक्यातील सिरोंजी गावाजवळील सर्रा कोरमेटा गावाकडून येणाऱ्या भानगडया नाल्याला पूर आला होता. याच नाल्यावरील पुलाहून करीम पठाण (रा. सागवन बन तहसील खमारपनी जिल्हा छिंदवाडा मध्यप्रदेश) हा आपल्या गावाला दुचाकीने जात असता पुराचा लोंढा आला आणि तो दुचाकीसह वाहून जात होता. दरम्यान, काही अंतरावर तिवारी भट्टीजवळ तो पळसाच्या झाडाला अडकला व आधार घेऊन तो झाडावर चढला. सुदैवाने त्याचा जीव वाचला त्याला कोरमेटा व सिरोंजी गावातील लोकांनी झाडावरून सुरक्षित खाली उतरविले. वेळीच लोक मदतीला धावल्याने तो थोडक्यात बचावला.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नये व गरजेनुसार सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. पाणी वाहत असताना चुकूनही पुलावरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपत्ती व्यवस्थापना संदर्भात कोणतीही माहिती द्यायची असल्यास व मदतीसाठी ०७१२-२५६२६६८ टोल फ्री क्रमांक १०७७ चा वापर करावा.