नागपूर : ऑगस्टमध्ये दांडी मारणाऱ्या पावसाने नागपूर जिल्ह्यात पोळ्याच्या पर्वावर दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्रभर बरसलेल्या श्रावणसरीनी शेतकरी सुखावला आहे.जिल्ह्यात पोळ्याच्या पाडव्याला मारबत उत्सव आणि तान्हा पोळा उत्साहात साजरा केला जातो. मात्र शहरात आणि ग्रामीण भागात संततधार पाऊस कोसळत असल्यामुळे तान्हा पोळ्याचे आयोजन करणाऱ्यांसह बच्चे कंपनीचा काहीसा हिरमोड झाला आहे.
इकडे हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. संततधार होत असलेल्या पावसामुळे पेंच तोतलाडोह व नवेगाव खैरी धरण पूर्ण १०० टक्के भरलेले असून तोतलाडोह धरणाचे १४ पैकी १० दरवाजे ०.४ मी तर नवेगाव खैरी धरणाचे सर्व १६ दरवाजे ०.३ मी ने उघडण्यात आलेले असून त्यामधून ५०० पेक्षा जास्त क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच नदीमध्ये सुरू आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणातून देखील नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. या अनुषंगाने नदी व धरणा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशानाच्या वतीने करण्यात आले आहे. पेंच, कन्हाण, कोलार, नांद नदी तर नागपूर शहरातील नाग, पिवळी, व पोहरा नदी शेजारी वसलेल्या गावांना व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही दक्षता बाळगा - वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये.- नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.- नदी, तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेष: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये.- नदी, धरण काठी वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमात होत असल्यास वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.