नागपूर : जून महिन्यात प्रतीक्षा करून सतावणारा पाऊस जुलैमध्ये सुखावणारा अनुभव देत आहे. गेल्या काही दिवसांत त्याची मेहरबानी सुरू आहे. हे सत्र शनिवारीही सुरूच हाेते. थाेड्या-थाेड्या अंतराने उसंत घेत पावसाने हजेरी लावली. कधी जाेरदार, तर कधी रिमझिम तुषार उडवित पावसाचा खेळ सुरू हाेता. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शहरात १४ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, दिवसाच्या तापमानातही १.९ अंशांची वाढ झाली व ३१.२ अंश नाेंदविण्यात आले.
तसे जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने ९ जुलैला विदर्भात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला हाेता व १२ जुलैपर्यंतही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, विदर्भात आज वर्धा येथे सर्वाधिक १०० मिमी पावसाची नाेंद झाली. ओरिसा व आसपासच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि बंगालच्या उपसागरात वाढलेल्या हालचालींमुळे पावसाची मेहरबानी सुरू आहे. नागपुरात सकाळपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू हाेता. सकाळी ११ वाजल्यापासून पुन्हा काळ्या ढगांची गर्दी वाढली आणि पावसाच्या सरी पडल्या. त्यानंतर, पुन्हा उसंत घेऊन पाऊस बरसला. अशा प्रकारे थांबून थांबून पाऊस जाेर दाखवत हाेता. हलक्या सरींनी वातावरण आल्हाददायक बनविले. सायंकाळपर्यंत सुरू असलेल्या या खेळामुळे नागरिकांना फारसा त्रास झाला नाही. बातमी लिहिस्ताेवर अग्निशमन विभागालाही काही अनुचित प्रकार घडल्याची तक्रार मिळाली नाही.
बहुतेक जिल्ह्यात चांगला पाऊस
विदर्भात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे. शनिवारी सर्वाधिक पाऊस वर्धा येथे झाला. येथे १०० मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. याशिवाय चंद्रपूर ४५ मिमी, बुलडाणा १६ मिमी, यवतमाळ ५ मिमी व गडचिराेलीत ४ मिमी पाऊस नाेंदविला गेला.