नागपूर : साेशल मीडियावर सध्या एक संदेश अधिकच फिरताेय. वरुणदेवा तूच सांग, आम्ही दिवाळीत नवीन कपडे व फटाके घ्यायचे की रेनकाेट? काही दिवस उघाड देऊन पाऊस पुन्हा पुन्हा सक्रिय हाेत असल्याने नागरिकांना वैतागल्यासारखे झाले आहे. त्यामुळे साेशल मीडियावरचा हा मिश्किल सवाल खराेखर विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
साेमवारी दुपारपर्यंत आकाश निरभ्रच हाेते. सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामात लागले हाेते. दिवाळीची खरेदी करण्यासाठी सीताबर्डी, महाल, इतवारी, गांधीबाग परिसरात लाेकांची गर्दी हाेती. दुपारनंतर वातावरण अचानक बदलले. आकाशात ढगांची गर्दी जमली आणि गडगडाटासह पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने रस्त्यावर, मार्केटमध्ये असलेल्या लाेकांची दाणादाण उडवून दिली.
पाऊस हाेणार नाही, असा विचार करून अनेकांनी रेनकाेटही साेबत घेतले नव्हते. सायंकाळी ४ नंतर थाेडी उसंत मिळाली. आता येणार नाही, असा विचार करत लाेक घराबाहेर पडले. ताेच सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पुन्हा वातावरण बदलले. पुन्हा ढगांचा गडगडाट जाेरात सुरू झाला आणि त्यासाेबत पाऊसही. किमान तासभर तरी पावसाच्या सरी धाे-धाे बरसल्या. त्यामुळे कार्यालयातून परतणारे व फिरायला बाहेर निघालेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
रात्री ८.३० वाजेपर्यंत तब्बल २४.५ मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. विशेष म्हणजे मंगळवारीही पाऊस हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अचानक बदलत्या वातावरणाची चिंता
पावसाची बदललेली शैली बुचकळ्यात टाकणारी आहे. आकाशात ढग नसतात. हवामान विभागाच्या रडारवरही ते दिसत नाही. नागपूर विभागाच्या रडारवर साेमवारी दुपारपर्यंत आकाश निरभ्रच दाखवित हाेते. मात्र सायंकाळी याच रडारवर ढगांची प्रचंड गर्दी दिसायला लागली. तज्ज्ञांच्या मते हवामानबदलामुळे वातावरण बदलायला दाेन तासही लागत नाही. अचानक कुठेतरी तापमानवाढीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार हाेताे आणि आकाशात ढग जमा हाेऊन आसपासच्या भागात पाऊस पडताे. हा लहरीपणा चिंता वाढविणारा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.