नागपूर : मंगळवारी नागपुरात सायंकाळी सुमारे पाऊण तास दमदार पाऊस झाला. यामुळे वातावरण थंडावले असले तरी ग्रामीण भागात पुरेसा पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांना असलेली प्रतीक्षा मात्र अद्यापही कायमच आहे.
मागील २४ तासात नागपुरात २.६ मिली पावसाची नोंद झाली. त्यातुलनेत मंगळवारी आलेला पाऊस चांगला होता. सकाळी थोडे आभाळ असले तरी दुपारी पावसाचा अंदाज नव्हता. सायंकाळी ४ वाजतानंतर आभाळ दाटून आले, अचानकपणे जोराचा पाऊस थांबून थांबून आला. यामुळे वातावरण चांगलेच थंडावले. हवामान विभागाने सकाळची आर्द्रता ९३ टक्के नोंदविली होती, ती सायंकाळी १०० टक्के नोंदविली गेली. शहरात चांगला पाऊस झाला असला तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतात पेरणी झाल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, नागपूर शहरासोबतच मागील २४ तासात विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. अकोला येथे १५.३ मिमी पावसाची नोंद झाली. अमरावती ५, बुलडाणा १०, चंद्रपूर ११, गडचिरोली १३.४, वर्धा १४.६ तर यवतमाळमध्ये २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दिवसात काही ठिकाणी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
...
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३३.५ : २२.१
अमरावती : ३४.० : २२.१
बुलडाणा : ३१.० : २३.०
चंद्रपूर : ३४.० : २३.६
गडचिरोली : ३२.० : २४.०
गोंदिया : ३३.५ : २२.५
नागपूर : ३३.७ : २५.२
वर्धा : ३४.० : २४.५
वाशिम : ३८.० : २०.६
यवतमाळ : निरंक : २३.०
...