नागपूर : विशिष्ट प्रवासाचे तिकीट खरेदी करून चुकीच्या रेल्वेत चढलेल्या आणि अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे वारसदारही भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी दिला. संबंधित व्यक्तीला अनधिकृत प्रवासी म्हणता येणार नाही, असेही सदर निर्णयात नमूद करण्यात आले.
देव्हाडी (ता. तुमसर, जि. भंडारा) येथील विक्की चौबे यांनी १२ डिसेंबर २०१२ रोजी नागपूर ते तुमसर प्रवासाचे रेल्वे तिकीट खरेदी केले होते. त्यानंतर, ते हावडा-ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये बसले. चौबे यांच्याकडील तिकीट या रेल्वेकरिता अधिकृत नव्हते. दरम्यान, मुंदीकोटा रेल्वे स्थानक येथे धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या आई मुन्नीबाई यांनी भरपाई मिळण्यासाठी रेल्वे न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. १७ जानेवारी २०१७ रोजी न्यायाधिकरणाने तो दावा खारीज केला. चौबे चुकीच्या रेल्वेत बसले होते, त्यामुळे त्यांना अधिकृत प्रवासी म्हणता येणार नाही, असे कारण दावा नाकारताना देण्यात आले. त्या निर्णयाविरुद्ध मुन्नीबाई यांनी उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले. त्यात उच्च न्यायालयाने हा सुधारित निर्णय दिला.
आठ लाख रुपये भरपाई मंजूरउच्च न्यायालयाने मुन्नीबाई यांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली, तसेच ही रक्कम त्यांना तीन महिन्यांत अदा करण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाला दिला.