नागपूर : वर्धा रोडवरील पत्नीचे आलिशान घर विकून विदेशात जाण्याची योजना आखणाऱ्या पतीविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सक्षम ऊर्फ अमोल मेश्राम (वय ४०), रा. चंद्रमणीनगर असे आरोपीचे नाव आहे. पीडित महिला एक सामाजिक कार्यकर्ती असून, संपन्न कुटुंबातील आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने तिची फसवणूक केल्यामुळे सहा महिन्यांपूर्वी ९ डिसेंबर २०२० रोजी तिने आपल्या कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध काही नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसांतच आरोपी सक्षम ऊर्फ अमोलने पत्नीला तिचे घर आपल्या नावावर करण्यासाठी दबाव टाकणे सुरू केले. तिला धमकी देऊन तो अनैसर्गिक कृत्य करू लागला. तो तिला मोठा व्यवसाय करून विदेशात स्थायिक होण्याची बतावणी करीत होता. परंतु काही दिवसांपूर्वी आरोपीने काही महिलांसोबत फेसबुकवर केलेली चॅटिंग त्याच्या पत्नीच्या हाती लागली. त्यानंतर पतीचा खरा चेहरा तिच्यासमोर आला. पत्नीने आपले घर विकण्यास नकार देऊन आरोपी पतीला काही काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आरोपी तिला बेदम मारहाण करू लागला. ११ मे रोजी आरोपीने पीडितेला बेदम मारहाण केली. तिच्या डोळा, चेहरा, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या. पतीने अत्याचार करूनही माहेरच्या व्यक्तींना माहिती देण्यास तिला संकोच वाटत होता. ती पतीच्या अत्याचाराने हताश झाली. परंतु ही घटना तिच्या काही ओळखीच्या व्यक्तींना माहीत झाली. त्यांनी पीडितेला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला. सोनेगावचे ठाणेदार दिलीप सागर यांनी घटनेची माहिती मिळताच जखमी पीडितेची वैद्यकीय तपासणी केली. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७७, ४९८ (अ), ३२३, ५०६ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
............
आधीच होती फसविण्याची योजना
मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्य करणारी पीडित महिला अनेक वर्षांपासून आपल्या वृद्ध आईसोबत एकटी राहते. लग्नापूर्वी २०१५ मध्ये आरोपी सक्षम हा महिलेच्या घरी खोली भाड्याने मागण्यासाठी आला होता. त्याने आपण भंते असल्याचे सांगून पुन्हा २०१७ मध्ये खोली भाड्याने मागितली. परंतु महिलेने त्यास खोली भाड्याने दिली नाही. त्यानंतर १९ एप्रिल २०२० रोजी पीडितेच्या घरी येऊन आपले २५ देशांत नेटवर्क असून आपला मोठा व्यवसाय असल्याचा दावा केला. त्याने महिलेला लग्नाची मागणी घालून तिची फसवणूक केली.
लग्नानंतर दाखविले खरे रूप
लग्नानंतर आरोपी संशयास्पद स्थितीत काही व्यक्तींसोबत कोणत्या तरी योजनेबाबत चर्चा करू लागला. पीडितेला अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक कृत्य करीत होता. विरोध केल्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत होता. रात्री उशिरापर्यंत महिलांसोबत फेसबुकवर चॅटिंग करून लवकरच थायलंडला येणार असल्याची माहिती देत होता.
............