हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही : ग्राहक संघटनांची नाराजी, जनजागृतीची आणखी गरज नागपूर : रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’, असा नियम करण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले. मात्र ग्राहक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोधा केला आहे. हेल्मेट सक्ती ही नागरिकांच्या हिताचीच आहे, असे सांगत याबाबत अधिक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे मत विविध ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. सदर प्रतिनिधीने पेट्रोल पंपाची पाहणी केली असता पंपावर ग्राहक हेल्मेटविना पेट्रोल भरताना दिसले. याशिवाय पंपावरील कर्मचाऱ्यांना या अध्यादेशाची माहिती नसल्याचे त्यांच्याशी चर्चेदरम्यान दिसून आले. सरकारी आदेश येईल, तेव्हा हेल्मेट घालणाऱ्या वाहनचालकांना आम्ही पेट्रोल देऊ, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) पंपांवर वाद होणार असा आदेश काढून सरकारला काय सिद्ध करायचे आहे, असा सवाल ग्राहक संघटनांनी केला आहे. सरकारने हेल्मेटची सक्ती करू नये, ते ऐच्छिक असावे. दुचाकी विकणाऱ्या डीलर्सनी ग्राहकांना हेल्मेट विक्रीची सक्ती करावी. सरकारच्या निर्णयामुळे प्रत्येक पंपावर वाद उद्भवतील आणि पोलीस तैनात करावे लागतील. परिस्थितीचा अभ्यास करून सरकारने सक्ती करावी. जीवनावश्यक वस्तूपासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.
हेल्मेट सक्ती हिताचीच, पण...
By admin | Published: July 23, 2016 3:16 AM