जनमत चाचणी : वापरण्यात अडचणी येत असल्याच्याही प्रतिक्रियानागपूर : वाहतूक शाखेने हेल्मेटसक्ती करून कारवाईला सुरुवात केल्यावर पोलिसांच्या भूमिकेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली. मार्च महिना जवळ आल्यामुळे पोलिसांना आपले टार्गेट पूर्ण करायचे असल्याने हेल्मेटसक्ती करण्यात आल्याचे आरोपही झाले. हे आरोप-प्रत्यारोप होत असताना नागपुरातील तिरपुडे कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेटसक्तीवर जनमत चाचणी घेतली. या चाचणीत नागरिकांनी हेल्मेट वापरण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु हेल्मेटचा वापर ऐच्छिक असावा, अशीही भूमिका मांडली. शहरात यापूर्वीही वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या त्या वेळी हेल्मेटच्या विरोधात राजकीय पाठबळ लाभल्याने हेल्मेटसक्तीचे प्रयत्न शहरात फिसकटले. फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा वाहतूक शाखेने अचानक हेल्मेटसक्ती करून कारवाईस सुरुवात केली. मात्र यावेळी राजकीय पक्षांनी नागरिकांना हेल्मेट विकत घेण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असा पवित्रा घेतला. वाहतूक शाखेनेही प्रतिसाद देत १ मार्चपासून कारवाईला प्रारंभ केला. यादरम्यान पोलिसांवर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. परंतु हेल्मेटसक्ती विरोधात सक्षम आंदोलन उभे होऊ शकले नाही. त्यामुळे दंडाच्या भीतीने का होईना, नागरिकांनी हेल्मेट खरेदी केले. पोलिसांच्या भीतीपोटी की स्वत:च्या सुरक्षेसाठी नागरिकांनी हेल्मेट खरेदी केले, या विषयावर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी यांनी २६ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान शहरातील विविध भागात जनमत चाचणी घेतली. यात २४०० उत्तरदात्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व सहा प्रश्नांच्या आधारे मते नोंदविण्यात आली. मोटरवाहन नियमान्वये दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराच्या अनिवार्यतेबाबत माहिती असल्याचे ९०.४१ टक्के नागरिकांनी सांगितले. हेल्मेटविना दुचाकीस्वारास गंभीर अपघात होऊ शकतो काय, या प्रश्नावर ७६.०४ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले. हेल्मेटचा वापर ऐच्छिक असावा काय? यावर ३१.१७ टक्के नागरिकांनी होकारात्मक प्रतिसाद दिला. सोबतच हेल्मेट वापरामुळे दोन्ही बाजूंना पाहणे कठीण होते, जीव गुदमरतो, अपघाताची भीती वाटते, हेल्मेट बाळगणे अडचणीचे जाते, आरोग्याच्या समस्या उद्भवतात, आदी तक्रारीही चाचणीतून पुढे आल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्या पुढाकाराने डॉ. दीपक मसराम, प्रा. मनीष देशमुख, प्रा. संध्या फटिंग, प्रा. दिगंबर टुले यांच्या मार्गदर्शनात ५० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ही चाचणी पूर्ण करण्यात आली. (प्रतिनिधी)
हेल्मेट आवश्यकच, पण वापर ऐच्छिक हवा!
By admin | Published: March 04, 2016 3:02 AM