लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य संमेलनात कोट्यवधींची उधळण करणे चुकीची बाब आहे. त्याऐवजी गरजू लेखकांना मदत करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी उचलावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले.आधारतर्फे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांचा सायंटिफिक सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार आशा बगे, पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, आधारचे डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर उपस्थित होते. एलकुंचवार म्हणाले, साहित्य संमेलनातील कोट्यवधींची उधळण टाळून आजारी असलेले, गरीब साहित्यिकांना मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी साहित्यिकांनी काही निधी जमवून शासनाकडून मदत मिळवून निधी उभारण्याचीगरज आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला काही अधिकार देण्याची गरज आहे. अरुणा ढेरेंच्या साहित्यावर बोलताना ते म्हणाले, अण्णांकडून अरुणाला वारसा मिळाला. अरुणा ढेरेंच्या कवितेतील स्त्री जवळ पाच हजार वर्षांच्या संस्काराचे संचित आहे. ती भावना व्यक्त न करणारी स्त्री आहे. अरुणा पुढे काय लिहिणार याचे कुतूहल असल्याचे ते म्हणाले. आशा बगे म्हणाल्या, संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्याचा पायंडा पाडणाऱ्या सर्वांचा निर्णय अभिनंदनीय आहे. मोती सापडणाऱ्या वाटेने अरुणा ढेरेंची वाटचाल सुरु असल्याचा उल्लेख त्यांनी केला. गिरीश गांधी म्हणाले, स्त्रीची भूमिका घेऊन लेखन करणाऱ्यांचा वारसा अरुणा ढेरे यांनी घेतला आहे. स्त्री वर लिखाण केले तरी त्यांनी कधीही स्त्रीवादी हट्टी भूमिका घेतली नाही. सत्काराला उत्तर देताना अरुणा ढेरे म्हणाल्या, मुलीला माहेरी मिळते ते प्रेम, कौतुक येथे मिळाले आहे. अनपेक्षितपणे अध्यक्षपद माझ्यापर्यंत आले. त्याकडे मी जबाबदारी म्हणून पाहत आहे. गरजू लेखकांसाठी काही करता आले तर बरे वाटेल. आपण जे लिहितो त्या मागे आपला स्पष्ट विचार असायला हवा अशी दृष्टी अण्णांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी साहित्यात मोठी ताकद असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संघमित्रा खंदारे, शुभदा फडणवीस,, मोहिनी मोडक, मनिषा अतुल, माधवी भट, पवन नालट, पराग घोंगे यांनी अरुणा ढेरे यांच्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक डॉ. अविनाश रोडे यांनी केले.संचालन आणि आभार प्रदर्शन शुभदा फडणवीस यांनी केले.
संमेलनातील उधळण टाळून गरजू साहित्यिकांना मदत करावी : महेश एलकुंचवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:54 PM
साहित्य संमेलनात कोट्यवधींची उधळण करणे चुकीची बाब आहे. त्याऐवजी गरजू लेखकांना मदत करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी उचलावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले.
ठळक मुद्देआधारतर्फे ९२ व्या अ. भा. साहित्य संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरेंचा सत्कार