लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनेन यांच्यासह कौन्सिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई सोनिया बार्ब्री मंगळवारी मनपाला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर स्मार्ट सिटीच्या सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी त्यांचे स्वागत करून नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पावर चर्चा केली. हा प्रकल्प २११७.७१ कोटीचा असून, यात केंद्र शासनाकडून ६० टक्के, राज्य शासनाकडून २५ टक्के, मनपाकडून १५ टक्के खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जिका)कजं देणार आहे. त्याप्रमाणे नाग नदीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा मनपा आयुक्तांनी व्यक्त केली.
प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी फ्रान्सकडून आर्थिक व तांत्रिक सहकार्याची मदत पडेल. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. यावर फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लीनेन यांनी सहकार्याची ग्वाही दिली. यावेळी अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, एनएसएससीडीसीएलचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, महाव्यवस्थापक राजेश दुफारे, नाग नदी प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार मोहम्मद इसराईल, महाव्यवस्थापक डॉ. प्रणिता उमरेडकर, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट(एएफडी)चे रिजनल डायरेक्टर फॉर साऊथ एशिया जॅकी एम्प्रो आदी उपस्थित होते.