लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञान व विज्ञान यांचा प्रभावी उपयोग करूनच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते, असे मत कोलकाता विद्यापीठाचे प्रा. स्वपनकुमार दत्ता यांनी व्यक्त केले.सीएसआयआर-नीरी येथे सोमवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी ‘शाश्वत पर्यावरण व अन्न सुरक्षेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज पारंपरिक शेती मागे पडली आहे. सध्या जास्तीतजास्त अन्न उत्पादित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भविष्यात शहरांतर्गतच अन्न उत्पादित केले जाईल. परंतु, आधुनिक शेती ही पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतपिकांवरील कीड ही मोठी समस्या आहे. दरवर्षी जगातील एक तृतीयांश पीक किडीमुळे नष्ट होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देशांमध्ये समन्वय स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच, वाढते तापमान, जमिनीचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर इत्यादीमुळे मातीमधील ऑर्गनिक कार्बन दिवसेंदिवस कमी होत आहे. हा देखील चिंतेचा विषय आहे. जमिनीतील हा घटक वाढायला हवा, असे दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी दत्ता यांचा परिचय करून दिला तर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.