देवता लाईफ फाऊंडेशन : धनादेश व सायकलींचे वाटपनागपूर : देवता लाईफ फाऊंडेशनतर्फे सामाजिक बांधिलकी जपत कॅन्सरग्रस्त बालकांना व आर्थिक परिस्थितीअभावी शालेय सोयीसुविधा उपलब्ध होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटेखानी समारंभ अभ्यंकरनगरातील देवता लाईफ फाऊंडेशनच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी १० कॅन्सरग्रस्त बालकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनतर्फे या मुलांना दर महिन्याला एक हजार रुपये देण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच शहरातील महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या ज्या मुलांना पायपीट करीत शाळेत जावे लागते, आर्थिक परिस्थितीअभावी त्यांना सायकलसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही अशा १० मुलींना फाऊंडेशनतर्फे सायकलचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी आपल्या आप्तस्वकीयांना कुठलीही भेटवस्तू न आणता शालेय साहित्य आणण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला मान देत मोठ्या संख्येने शालेय साहित्य गोळा झाले. फाऊंडेशनतर्फे या साहित्याचेही वितरण शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. रविवारी पार पडलेल्या सायकल वाटपाच्या कार्यक्रमाला स्वत: किशोर बावणे, फाऊंडेशनचे सल्लागार विवेक जुगादे, संचालिका नीलिमा बावणे, सारस्वत बँकेच्या विदर्भ प्रमुख रेणुका वाचासुंंदर, समन्वयक धनश्री गांधारे उपस्थित होते.(प्रतिनिधी)
कॅन्सरग्रस्त व गरजूंना मदतीचा हात
By admin | Published: May 16, 2016 3:10 AM