लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळ येथे आलेल्या जलप्रलयानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील युद्धस्तरावर मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांच्या माध्यमातून केरळकडे मदत पाठविण्यात येत असून पूरग्रस्तांच्या बचाव व पुनर्वसनासाठी सेवाभारतीतर्फे ३५० हून अधिक मदतशिबिरे उघडण्यात आली आहेत. देशभरातून पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक केरळमध्ये मदतकार्यासाठी पोहोचले असून यात नागपूर व विदर्भातील स्वयंसेवकांचादेखील समावेश आहे.केरळमध्ये पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर तातडीने संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तेथील नुकसान लक्षात घेता संघाकडून शक्य ती मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीदेखील स्वयंसेवकांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. देशभरातील स्वयंसेवकांकडून मदतकार्याला लागणार निधी, मदत साहित्य, कपडे, खाद्यपदार्थ, पाण्याच्या बॉटल, औषधे इत्यादी सामग्री युद्धस्तरावर गोळा करण्यात येत आहे. प्रांतस्तरावर याची नोंद घेण्यात येत आहे. नागपुरातूनदेखील संघ स्वयंसेवकांनी केरळकडे मदतसामग्री पाठविली आहे.सेवाभारतीतर्फे ३५० मदत शिबिरांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत पोहोचविण्यात येत आहे. सोबतच रक्त संकलन करण्यासाठी १० शिबिरे, अलपुझा जिल्ह्यात २० वैद्यकीय शिबिरे उघडण्यात आली आहेत. आतापर्यंत चार लाखांहून अधिक ‘फूड पॅकेट्स’ वितरित करण्यात आली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.दुर्गम भागाकडे विशेष लक्षकेरळमधील वायनाडसारख्या जिल्हांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणा, सैन्यदलाकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. मात्र दुर्गम भागामध्ये मदत पोहोचायला अडचणी येत आहे. त्यामुळे संघाने दुर्गम भागाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.पुनर्वसनासाठीदेखील मदत करणारकेरळमधील नागरिकांना मदत करणे आमचे कर्तव्यच आहे. सध्या तेथील नागरिकांना मूलभूत साहित्य पोहोचविणे व त्यांचे आरोग्य ठीक कसे राहील, यावर भर देण्यात येत आहे. मात्र पुरामुळे केरळमधील हजारो घरे नुकसानग्रस्त झाली असून लाखो नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांच्या पुनर्वसनासाठीदेखील आम्ही शक्य तेवढी मदत करू, अशी माहिती संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
केरळसाठी संघाकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:35 PM
केरळ येथे आलेल्या जलप्रलयानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेदेखील युद्धस्तरावर मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. संघ परिवारातील विविध संघटनांच्या माध्यमातून केरळकडे मदत पाठविण्यात येत असून पूरग्रस्तांच्या बचाव व पुनर्वसनासाठी सेवाभारतीतर्फे ३५० हून अधिक मदतशिबिरे उघडण्यात आली आहेत. देशभरातून पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक केरळमध्ये मदतकार्यासाठी पोहोचले असून यात नागपूर व विदर्भातील स्वयंसेवकांचादेखील समावेश आहे.
ठळक मुद्देस्वयंसेवकांकडून मदतकार्य सुरूसेवाभारतीची ३५० हून अधिक मदत शिबिरे, पाच हजारांहून अधिक स्वयंसेवक मदतकार्यात लागले