तिघांचा जामीन फेटाळला सत्र न्यायालय : राजश्री टंडन खून प्रकरण नागपूर : अॅड. राजश्री टंडन ऊर्फ राजकुमारी सतीशकुमार सोलोमन खूनप्रकरणी बालगुन्हेगाराला सहाय्य केल्याचा आरोप असलेल्या तिघांचे जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले. मनोज पांडुरंग चौधरी (७४) रा. मानवसेवानगर सेमिनरी हिल्स, आकाश रेवाराम वासुदेवे (१९) रा. सेमिनरी हिल्स आणि अनिता राजेश वनवे (४२) रा. सुरेंद्रगड, अशी आरोपींची नावे आहेत. मृत राजश्री टंडन (५३) ही व्हेटरनरी कॉलेजमागील चौधरी ले-आऊट येथील रहिवासी होती. राजश्री आणि बालगुन्हेगारामध्ये कोणत्या न कोणत्या कारणांवरून वाद व्हायचा. त्यांनी एकमेकांविरुद्ध बरेचदा गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत. १४ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.१५ वाजाताच्या सुमारास पायी जात असलेल्या टंडनचा बालगुन्हेगाराने पाठलाग केला होता. टंडनने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी मॉन्टेज फोटो स्टुडिओमध्ये शिरताच त्याने स्टुडिओमध्ये टंडनवर चाकूने क्रूरपणे वार करून तिचा जागीच खून केला होता. या बालगुन्हेगाराचे रक्ताने माखलेले कपडे अनिता वनवे हिने आपल्या घराच्या अंगणात जाळले होते. मनोज चौधरी हा बालगुन्हेगाराचा आजोबा असून, त्याने त्याच्यासाठी दुसरे कपडे मागवून दिले होते आणि पळून जाण्यास मदत केली होती. आकाश वासुदेवे याने अॅक्टिव्हाने या बालगुन्हेगाराला कोराडी येथे सोडून दिले होते. पोलिसांनी भादंविच्या ३०२,२०१ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या तिन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल करताच त्यांचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मारेकऱ्यास साहाय्य
By admin | Published: April 26, 2017 1:49 AM