लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या टाळेबंदीने इतर सर्वसामान्य क्षेत्रातील नागरिकांप्रमाणेच चेहऱ्यावर रंग फासून ग्लॅमर जगतात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांचे मनोरंजन, प्रबोधन करणारे रंगकर्मी बेरोजगारीमुळे हवालदिल झाले आहेत. या रंगकर्मींची रसिकवर्गात प्रचंड क्रेज असली तरी ती क्रेज जगण्यास पुरेसी नाही. जगण्यासाठी पैसा लागतो आणि म्हणूनच लोकमतने कलावंत तगण्याची आणि माणूस म्हणून जगण्याची गरज यासारखे विषय हाताळत नाट्यपरिषद, सांस्कृतिक संचालनालय आणि राज्य व केंद्र सरकारकडे सवाल उपस्थित केला होता. या विषयाला सरकारात्मक प्रतिसाद देत नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने स्व:बळावर नागपूरच्या रंगकर्मींना मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.
नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे आणि इतर कार्यकारीणीच्या प्रयत्नांतून ही मदत पोहोचवली जात आहे. अ.भा. मराठी नाट्यपरिषदेने व्यावसायिक रंगकर्मींच्या जगण्याचा तात्पुरता प्रश्न सोडविण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयाचा निधी गोळा करून तो गरजूंपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. विदर्भ, मराठवाडा येथील कलावंतांना स्थान नव्हते. या विषयावरही लोकमतने नाट्यपरिषदेचा अखिल भारतीय चेहरा संकुचित! अशा मथळ्याखाली विषय हाताळत नाट्यपरिषदेला धारेवर धरले होते. याच विषयाला धरून नाट्यपरिषदेचे उपक्रम उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आणि राज्यातील सर्वच शाखांना त्यांच्या त्यांच्या भागातील गरजू कलावंतांची यादी तयार करण्याचे आदेश नाट्यपरिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिले आहेत. नाट्यपरिषदेला उशीरानेच परंतु योग्य वेळेवर सुचलेल्या शहाणपणाने टाळेबंदीमुळे कोमेजलेल्या गरजू रंगकर्मींच्या चेहऱ्यावर हास्य उमटण्यास सुरुवात झाली आहे.
त्याअनुषंगाने नागपुरातील नागपूर व महानगर शाखेने अत्यंत हलाखीच्या परिस्थिती जगत असलेल्या रंगकर्मींची यादी नाट्यपरिषदेकडे पाठवली आहे आणि योग्य ती तपासणी केली जाऊन दोन-तीन टप्प्यात लवकरच मदत पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी नागपूर शाखेने त्याही पलिकडे जात स्व:प्रयत्नाने निधी गोळा करत नागपुरातील गरजू रंगकर्मींना मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. तसे एसएमएस रंगकर्मींच्या मोबाईलवर झळकत असल्याने पडत्या काळात अल्पसा का होईना, आधार मिळत असल्याने रंगकर्मी समाधान पावले आहेत.मनाकसंची पायपीट सुरूनागपुरातील रंगकर्मींना मदतीसाठी नागपुरातील प्रतिथयश रंगकर्मींनी एकत्र येत मराठी नाट्य कलावंत संघटना (मनाकसं) ही संघटना स्थापन केली आहे. संघटनेची कार्यकारीणी खंबीर अशा मदतीसाठी शहरातील सर्व आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री आणि धनाड्य व्यक्तींकडे पायपीट करत आहे. त्याचाच हा परिणाम म्हणून रंगकर्मींपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.