सुमेध वाघमारे
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नऊ महिने त्याला पोटात जीवापाड सांभाळले... रक्ताचे पाणी करून २२ वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले...आता कुठे तो उमेदीच्या वयात आला होता...आता कुठे त्याला यशाच्या अथांग आकाशात मोठी भरारी घ्याची होती...पण, हाय रे दुर्दैव... एका बेसावध क्षणी अपघात घडला आणि शरीर-हृदयातील संवेदनाच हरवली... आता ती त्याच्याजवळच बसून असते. तो डोळे उघडेल, ए आई म्हणून हाक मारेल अशी भाबडी आशा गोंजारत... वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने तो ‘ब्रेन डेड’ झालाय. त्याचे अवयव गरजूच्या कामी येतील असे डॉक्टरांना वाटतेय. पण ती मात्र त्याला सोडायला तयार नाही. आणखी दोन दिवस थांबा ना, एवढीच ती काकुळतीला येऊन प्रार्थना करते. कारण शेवटी ती आई आहे.नागपुरातील एका खासगी रुग्णालयातील हा प्रसंग. पोटचा गोळा या जगातून गेला हे सत्य स्वीकारायला या मातेचे मन तयारच नाही. म्हणून तिची ही घालमेल. काय करावे, तिला कसे समजवावे या संभ्रमात डॉक्टरही आहेत. पण मातृत्वापुढे तेही हतबल आहेत. सकाळपर्यंत तिची समजूत घालून आणि तिच्या ‘ब्रेन डेड’ झालेल्या मुलाचे अवयव संबंधित गरजूंना देऊन त्यांचे प्राण वाचतील, दोघांना दृष्टी मिळेल या प्रयत्नात डॉक्टर आहेत. कारण अवयवदानाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देणारी तीही कुणाची तरी मुले आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांची आई अशीच तळमळत असेल. डॉक्टरांचे प्रयत्न योेग्यच आहेत. परंतु मातेची वेडी माया विज्ञानाच्या निकषांवर भारी पडतेय. त्याला कारणही तसेच आहे. मुलगा ब्रेन डेड झाला असला , त्याच्या हृदयाने काम करणे बंद केले असले तरी त्याच्या हातापायातील चेतना अद्याप पूर्ण संपलेली नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी त्याची आई त्याच्याकडे पाहत असताना मध्येच कधीतरी त्याचे बोट हलते आणि आईच्या निराश काळजात आशेचे असंख्य दीप एकाचवेळी प्रज्वलित होतात. डॉक्टरांच्या लेखी मात्र रुग्णाची ही हालचाल अजिबात आशादायी नाही. मधून कधीतरी बोट हलत असले तरी हृदयाची गती थांबली आहे. हे कटू असले तरी सत्य आहे आणि सत्य कधीच नाकारता येत नाही, हे त्या अभागी मातेला डॉक्टर पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या या प्रयत्नांना यश येईल, मुलाच्या दुर्दैवी मृत्यूचे दु:ख बाजूला सारून त्याची माता अवयवदानाला परवानगी देईल आणि त्यातून आणखी काहींचे प्राण वाचू शकतील, यासाठी डॉक्टरांची अविरत धडपड सुरू आहे.